डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावर घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. सुप्रिया सुळे या बैठकीला जाणार नसल्याचे पक्षाकडून आधीच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतून पवार यांचा पक्ष बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे.
शिंदे यांची वेगळी भूमिका
काँग्रेसचा डिलिमिटेशनला जोरदार विरोध असतानाच पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. शिंदे म्हणाले, माझं मत आहे, डिलिमिटेशन व्हायला पाहिजे. वेळ खूप निघून गेलेला आहे. लोकसंख्या जशी वाढते तसे प्रतिनिधी मिळायला पाहिजेत. त्यामुळे डिलिमिटेशन होणं जरुरीचं आहे, असे त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर बोलताना शिंदे यांनी मोठे विधान केले. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे, त्यावर मी बोलू शकत नाही. आमचा आणि त्यांचा पक्ष वेगळा आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसची भूमिका २०११ नंतर पुन्हा एकदा डिलिमिटेशन करून त्याप्रमाणे करावं, अशी असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता काळ पुढे गेलेला आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे. डिलिमिटेशन सर्व संमतीने झाले असते तर फार बरे झाले असते, असेही शिंदे म्हणाले.
आघाडीत फूट आणि टीकेची झोड
शरद पवार यांचा पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावरून काँग्रेसकडून जोरदार टीका केली जात आहे. पवार यांचा पक्ष सत्तेशिवाय राहू शकत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. इंडिया आघाडीचा डिलिमिटेशनला विरोध असून आघाडीने यासंदर्भात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मात्र, या बैठकीला पवार गटाचा एकही खासदार उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा