हिवाळ्यात वातावरणात गारवा असतो. अशा वेळी जर तुम्हाला घाम येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हिवाळ्यात घाम येणे हे तुमच्या शरीरातील काही समस्यांचे लक्षण असू शकते. चिंता, तणाव आणि मायग्रेन यांसारख्या गंभीर समस्यांचेही हे लक्षण असू शकते, असे वैद्यकीय माहितीत सांगितले जाते.
हिवाळ्यात घाम येण्याची सामान्य कारणे
घाम येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे, ज्याद्वारे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते. जेव्हा शरीर जास्त गरम होते तेव्हा घाम ग्रंथी त्वचेवर ओलावा सोडतात आणि घाम सुकल्यावर शरीर थंड होते. ही प्रक्रिया कोणत्याही ऋतूमध्ये होऊ शकते. हिवाळ्यात घाम येण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे खूप जास्त कपडे घालणे. स्वेटर, जॅकेट आणि इतर जाड कपड्यांमुळे उष्णता रोखली जाते, त्यामुळे शरीराचे तापमान वाढते आणि घाम येतो. जिने चढ-उतार करणे, व्यायाम करणे किंवा डान्स करणे यांसारख्या शारीरिक हालचालींमुळेही थंड वातावरणात शरीराचे तापमान वाढू शकते.
तणाव आणि आहाराचाही परिणाम
सतत तणाव आणि चिंता केल्यानेही हिवाळ्यात घाम येऊ शकतो. शरीरावर ताण आल्यावर कॉर्टिसोलची पातळी वाढते आणि शरीरातील उष्णता वाढते. मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तसेच कॉफीचे सेवन केल्यानेही हिवाळ्यात जास्त घाम येऊ शकतो, कारण हे पदार्थ शरीरातील उष्णता वाढवतात. त्यामुळे हिवाळ्यात घाम येत असेल तर त्यामागील कारणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा