ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवार यांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे या विधेयकावरून पवार गटातच दोन प्रवाह असल्याचे सांगितले जात आहे. भाजपसोबत जाणे राष्ट्रवादीच्या या गटाला पचलेले नसल्याचेही सांगितले जात आहे. या सर्व गदारोळात शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी एक सूचक ट्विट केले आहे.
२०२२ मध्ये दादांनी वेगळा निर्णय घेतला, तेव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो. आजही आणि उद्याही तीच भूमिका कायम असेल, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादीने डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणे आणि रोहित पवार यांचे ट्विट यांचा अचूक वेळ जुळल्याने त्यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवारांच्या निधनाला दहा महिने
दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनाला दहा महिने पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी हे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. अजितदादांना जाऊन आज दहा महिने पूर्ण झाले, परंतु अद्यापही त्यांच्या अपघात आणि घातपात प्रकरणाचा ना एफआयआर झाला ना कुठला तपास झाला, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
आभाळाएवढा माणूस गेला, पण या घटनेच्या तपासाबाबत कुणालाही सोयरसुतक नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. बहुतेकांनी सत्यापेक्षा सत्तेला महत्त्व दिल्याचे मी बघितले आणि बघतोय, असे सांगतानाच काहीही झाले तरी दादांसाठीचा आणि जनतेसाठीचा आमचा लढा थांबणार नाही, असे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत
रोहित पवार यांच्या ट्विटचे अनेक अर्थ काढले जात आहेत. पक्षाच्या भूमिकेबद्दल काही नेत्यांमध्ये नाराजी असून रोहित पवार यांची स्वतंत्र भूमिका चर्चेचा विषय बनली आहे. डिलिमिटेशन विधेयकावरून पक्षात दोन प्रवाह असल्याची चर्चा असतानाच रोहित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केल्याने या वादाला आणखी धार आली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचे बोलले जात आहे. रोहित पवार यांच्या ट्विटनंतर पक्षातील अंतर्गत संघर्षाची चर्चा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा