गुइलेन-बॅरे सिंड्रोममुळे (जीबीएस) कोल्हापुरातील कळंबा गावातील ११ वर्षीय राजवर्धन नितीन बुचडे याचा मृत्यू झाला आहे. छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. राजवर्धन महालक्ष्मी गल्ली, कळंबा येथे राहत होता. या घटनेनंतर कळंबा गावात हाहाकार माजला असून आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
गावात आरोग्य तपासणी मोहीम
कणेरी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी केली जात आहे. महालक्ष्मी गल्ली, राम गल्ली, हनुमान गल्ली, टिपुगडे गल्ली आणि तिवले गल्ली या भागांमध्ये तपासणीवर विशेष भर दिला जात आहे. जिल्हा परिषद सदस्या विनीता भोगम आणि सरपंच सुमन गुरव यांनी नागरिकांना घाबरून न जाता आरोग्य यंत्रणेला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
गावातील जलवाहिनीत सांडपाणी मिसळते का, याचीही तपासणी केली जात आहे. प्राण्यांची विष्ठा पाण्यात मिसळल्याने हा संसर्ग पसरू शकतो, असे कणेरीतील वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मस्के यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याची तपासणी केली जात असून आशा सेविकांची बैठक घेऊन आरोग्य तपासणीचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
गुइलेन-बॅरे सिंड्रोम म्हणजे काय?
गुइलेन-बॅरे सिंड्रोम ही अशी स्थिती आहे, ज्यात शरीराची रोगप्रतिकारशक्ती नसांवर हल्ला करते. यामुळे शरीरात खूप कमकुवतपणा येऊ शकतो, हात-पाय बधिर होऊ शकतात आणि अर्धांगवायू होण्याची शक्यता असते. जीबीएस हा दुर्मिळ आजार असून यात शरीराचे स्नायू अचानक कमकुवत होतात.
क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, जीबीएसमध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती असामान्य पद्धतीने प्रतिसाद देते आणि परिघीय नसांवर हल्ला करते. काही काळानंतर हा हल्ला अचानक थांबतो. योग्य उपचाराने रुग्ण पूर्णपणे बरे होतात. पण आपलीच रोगप्रतिकारशक्ती नसांवर असा अचानक हल्ला का करते, याचे ठोस कारण डॉक्टरांना अजून सापडलेले नाही. मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, यामागे मॉलिक्युलर मिमिक्री ही संकल्पना असू शकते. यात नसांतील काही गोष्टी विषाणू किंवा संसर्गासारख्या भासतात, रोगप्रतिकारशक्ती गोंधळून जाते आणि विषाणूशी लढताना नसांवर हल्ला करते.
जीबीएसची लक्षणे अचानक दिसून येतात. शरीराच्या दोन्ही बाजूंना त्रास होतो. याची सुरुवात पायांपासून होते आणि त्यानंतर हे हात आणि चेहऱ्यापर्यंत पसरते. लक्षणे दिसू लागल्यानंतर पहिल्या दोन आठवड्यांत खूप कमकुवतपणा येतो. हात-पाय किंवा बोटांना मुंग्या येत असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार डॉक्टरांना तात्काळ दाखवावे.
प्रतिक्रिया व्यक्त करा