‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेत सध्या झळकणारा अभिनेता मनीष नागदेव याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. मनीषने पत्नी मलिका जुनेजा हिच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून दोघांचा घटस्फोट या महिन्याच्या सुरुवातीलाच मंजूर झाला आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने परस्पर संमतीने नात्याला पूर्णविराम दिला आहे.
या कठीण काळाबद्दल मनीषने पहिल्यांदाच मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. त्याने सांगितले की हा त्याच्या आयुष्यातील सर्वांत कठीण निर्णयांपैकी एक होता. जवळपास सहा महिन्यांचा असा काळ होता, जेव्हा दोघांमध्ये फारसा संवादच नव्हता. छोट्या-छोट्या गोष्टींवरूनही त्यांच्यात वाद होत असत आणि हळूहळू त्यांचा संवाद पूर्णपणे थांबला.
एकाच छताखाली राहूनही भावनिक अंतर
मनीषने सांगितले की ते एकाच छताखाली राहत होते, पण भावनिकदृष्ट्या खूप दूर गेले होते. दोन व्यक्ती वैयक्तिकरित्या खूप चांगल्या असू शकतात, पण याचा अर्थ असा नाही की त्या जीवनसाथी म्हणूनही एकमेकांसाठी योग्य असतीलच, असे त्याचे मत आहे. मलिका आणि त्याने नाते टिकवण्यासाठी मनापासून प्रयत्न केले, पण कालांतराने त्यांना जाणीव झाली की ते एकमेकांसाठी योग्य नाहीत.
खूप विचार केल्यानंतर आणि प्रामाणिकपणे चर्चा केल्यानंतर दोघांनी मिळून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. हा काही घाईघाईत घेतलेला किंवा रागाच्या भरात घेतलेला निर्णय नव्हता. या काळात त्यांनी एकमेकांना पुरेशी मोकळीक दिली आणि त्यांचा संवाद केवळ कायदेशीर प्रक्रियेशी संबंधित बाबींपुरताच मर्यादित ठेवला.
कुटुंबांचा पाठिंबा आणि लग्नाबद्दलची भूमिका
मनीषने सांगितले की त्यांनी एकमेकांच्या पसंतीने लग्न केले होते आणि दोन्ही कुटुंबांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला होता. त्यामुळे वेगळे होण्याच्या निर्णयाने कुटुंबांना धक्का बसला आणि सुरुवातीला तो निर्णय स्वीकारणे त्यांच्यासाठी कठीण होते. परंतु ही परिस्थिती अत्यंत समजूतदारपणे आणि आदराने हाताळल्यामुळे कुटुंबांनी शेवटी त्यांचा दृष्टिकोन समजून घेतला आणि त्यांना पाठिंबा दिला.
नाते यशस्वी झाले नाही तरी त्यातून कुटुंबांमध्ये कटुता किंवा संघर्ष निर्माण होणार नाही, याची काळजी घेणे महत्त्वाचे असते, असे मनीषचे म्हणणे आहे. सोबती असण्यावर आणि आयुष्यात कोणासोबत तरी जीवन वाटून घेण्याच्या सौंदर्यावर त्याचा अजूनही विश्वास आहे. मात्र लग्नासाठी केवळ प्रेमापेक्षाही अधिक गोष्टींची गरज असते. त्यासाठी प्रचंड संयम, समज, भावनिक परिपक्वता आणि आयुष्याकडे पाहण्याचा समान दृष्टिकोन असणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. योग्य व्यक्तीची निवड करणे हे लग्न करण्याच्या निर्णयाइतकेच महत्त्वाचे असते, असेही त्याने नमूद केले.
मनीष नागदेवने हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने ‘बनू मैं तेरी दुल्हन’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बेगुसराय’ आणि ‘उडान’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा