ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करूनही महिनोनमहिने दंड न भरणाऱ्या वाहनधारकांसाठी महाराष्ट्र सरकारने खास ‘अभय योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभागी होऊन थकित ट्रॅफिक चालानचा दंड भरल्यास २० टक्के सूट मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली असून, तिचे नाव ‘महाराष्ट्र वाहतूक पोलीस चलान अभय योजना-२०२६’ असे ठेवण्यात आले आहे.
ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केल्यावर वाहतूक विभागाकडून आर्थिक दंडाचे चलान केले जाते. मात्र अनेक वाहनधारकांनी महिनोनमहिने ही रक्कम भरलेली नाही. त्यामुळे थकीत दंडाची रक्कम मोठी झाली असून, तिची वसुली करण्यासाठीच सरकारने ही योजना आणली आहे. या योजनेमुळे वाहनधारकांना थकबाकी भरून आपले वाहन दंडमुक्त करता येणार आहे.
थकित दंडाच्या रकमेवर एकवेळची बाब म्हणून वीस टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनांवरील दंडाची वसुली करण्यासाठी सरकारने ही योजना तीन टप्प्यांत राबवण्याचे ठरवले आहे.
तीन टप्प्यांत राबवली जाणार योजना
पहिल्या टप्प्यात १ जानेवारी २०२६ पासून ३१ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान भरल्यास दंडाच्या एकूण रकमेवर २० टक्क्यांची सूट मिळणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १ नोव्हेंबर २०२६ नंतर आकारण्यात आलेल्या ट्रॅफिक चालानचा दंड पुढील ४५ दिवसांत भरल्यास २० टक्क्यांची सूट मिळेल. तिसऱ्या टप्प्यात २०१९ पासून प्रलंबित असलेल्या दंडाची रक्कम डिसेंबर महिन्यात कधीही भरल्यास एकूण दंडावर २० टक्क्यांची सूट मिळणार आहे.
न भरल्यास कठोर कारवाईचा इशारा
वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करून दंडास पात्र ठरणाऱ्या वाहनचालकांनी या अभय योजनेचा लाभ घेऊन दंड भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेऊनही दंड न भरल्यास भविष्यात संबंधितांचे वाहन चालवण्याचा परवाना रद्द केला जाईल किंवा त्यांचे वाहन जप्त केले जाईल, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.
या योजनेमुळे थकित दंडाची वसुली होण्यास मदत होणार असून, वाहनधारकांनाही दंडाच्या रकमेवर सवलत मिळणार आहे. डिसेंबर महिन्यात दंड भरणाऱ्या वाहनधारकांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा