शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक अर्थात डिलिमिटेशन बिलासाठी भाजपप्रणित एनडीए आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. शरद पवार गटातील नेत्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. तर शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा द्यावा लागेल, अशी हतबलता व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.
काँग्रेसच्या दोन पोस्टमध्ये काय म्हटले आहे
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. एका पोस्टमध्ये काँग्रेस पक्षाने शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने कसा त्याग केला, याची आठवण करून दिली आहे. तसेच काँग्रेसकडून राहुल गांधी आणि शरद पवार यांचा एक फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. दिल्लीत टिपण्यात आलेल्या या फोटोत राहुल गांधी यांनी शरद पवार यांचा हात घट्ट पकडल्याचे दिसत आहे. ते त्यांना आधार देताना दिसत आहेत. या फोटोसोबत, ‘गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता’, अशी कॅप्शन लिहिण्यात आली आहे.
दुसऱ्या पोस्टमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार, सुप्रिया सुळे आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.
राज्यसभेच्या निवडणुकीची आठवण
काँग्रेसच्या पोस्टनुसार, शरद पवार यांना वयाच्या ८५व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे १० आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे १६, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली.
प्रतिक्रिया व्यक्त करा