, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

ठाण्यातील रिक्षा-टॅक्सी बंद स्थगित; आठ मागण्या मंजूर

ठाण्यात १ डिसेंबरला पुकारलेलं रिक्षा-टॅक्सी बंद महिनाभरासाठी स्थगित झालं आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर ११ पैकी आठ मागण्या मंजूर झाल्या आहेत.

ठाण्यातील रिक्षा-टॅक्सी बंद स्थगित; आठ मागण्या मंजूर

ठाण्यात १ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेलं रिक्षा आणि टॅक्सीचं बंद आंदोलन महिनाभरासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतर ठाणे शहर रिक्षा-टॅक्सी संयुक्त कृती समितीने हा निर्णय घेतला. शुक्रवारी ठाणे आरटीओ कार्यालयात झालेल्या बैठकीत समितीच्या बहुतांश मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाला.

अकरा पैकी आठ मागण्या मान्य

रिक्षा-टॅक्सीचे सुधारित भाडेदर, सीएनजी सिलिंडर चाचणीचे दर निश्चित करणे, नवीन रिक्षा स्टँडना मंजुरी आणि बाइक टॅक्सीवर कारवाई अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं. बैठकीत समितीच्या ११ मागण्यांपैकी आठ मागण्या मंजूर करण्यात आल्या. उर्वरित तीन मागण्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील असल्याने त्यांचा पाठपुरावा करण्याची ग्वाही सरनाईक यांनी दिली. आगामी हिवाळी अधिवेशनादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या मागण्या मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिलं. मात्र, महिनाभरात तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.

या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, वरिष्ठ अधिकारी, विविध रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत कृती समिती तसेच इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा पाढा परिवहन मंत्र्यांसमोर वाचला. किमान भाडे ३० रुपये करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. रिक्षाचालकांच्या सर्व मागण्या आणि समस्या ऐकून घेत सरनाईक यांनी त्या कशा सोडवता येतील, यावर चर्चा केली. यातील बहुतांश मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, परिवहन विभाग रिक्षाचालकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितलं.

रिक्षाचालकांच्या इतर मागण्यांवर काय?

ठाणे शहरातील आवश्यक सर्व रिक्षा स्टँडना मंजुरी देण्यात येईल, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केलं. रिक्षाचालकांना ई-चलनांमुळे भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन परिवहन विभागामार्फत स्वतंत्र अभय योजना लवकरच आणण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आलं.

सरकारी आणि निमसरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांचे रिक्षा परवाने रद्द करण्याची मागणी संघटनांनी केली होती. यावर अशा कर्मचाऱ्यांचे परवाने रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश सरनाईक यांनी दिले. याबाबत राज्यभरासाठी परिपत्रक काढले जाईल, असेही त्यांनी सांगितलं.

कोणत्याही बाइक टॅक्सीला परिवहन विभागाने परवानगी दिलेली नाही. बाइक टॅक्सीवर यापूर्वी कारवाई करण्यात आली असून, पुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितलं. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठक होणार आहे. भाडेवाढीचा फेरआढावाही होणार असून, बैठकीत संघटनांनी दिलेल्या आकडेवारीनंतर भाडेवाढ पुन्हा मोजली जाईल, असे परिवहन आयुक्तांनी सांगितलं. याबाबत एमएमआरडीएच्या समितीपुढे पुन्हा प्रस्ताव सादर करून निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही देण्यात आलं.

दरम्यान, सरनाईक यांनी १ डिसेंबरचा संभाव्य बंद मागे घेण्याची विनंती समितीला केली. त्यानंतर समितीचे सल्लागार जितेंद्रकुमार इंदिसे यांनी आंदोलन महिनाभरासाठी स्थगित करत असल्याचे जाहीर केलं.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance