मतदारसंघ पुनर्रचना म्हणजेच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी स्पष्ट भूमिका पक्षाचे खासदार अमर काळे यांनी मांडली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विषयावर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना काळे यांनी सांगितले की, आव्हाड कुठल्या आधारावर बोलले, हे आपल्याला माहिती नाही.
आव्हाड यांनी काय म्हटले होते
आव्हाड यांनी सांगितले होते की, शरद पवार यांनी अनौपचारिक चर्चेत त्यांना सांगितले होते की, मतदारसंघ पुनर्रचना गरजेची असते. डिलिमिटेशन हे घटनात्मक असून ते करावेच लागते, त्याला पर्याय नसतो, असे पवार म्हणाले होते, असा आव्हाड यांचा दावा होता. पवार हे आपले दैवत असून त्यांचीच भूमिका आपली भूमिका असल्याचेही आव्हाड म्हणाले होते. डिलिमिटेशनला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचेही त्यांनी म्हटले होते.
पक्षात चर्चा झाली नाही, काळे स्पष्ट
या वक्तव्यावर काळे म्हणाले की, संसदेत या विधेयकावर मतदान होणार आहे, हे खरे असले तरी पक्षाच्या पातळीवर या मुद्द्यावर आतापर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. विधेयकाला पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा, याबाबत पक्षाकडून अद्याप कोणतेही स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत. दुष्काळाच्या बैठकीत या विषयावर केवळ पाच मिनिटे चर्चा झाली होती, असे काळे यांनी सांगितले. त्यावेळी जिल्ह्याचे खासदार म्हणून आपली भूमिका आपण पक्षाच्या नेत्यांसमोर मांडली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले होते की, विधेयक आल्यावर त्याचा मसुदा पाहून संपूर्ण विचार करून निर्णय घेतला जाईल. मात्र, त्यानंतर या विषयावर कोणतीही बैठक झालेली नाही. दिल्लीला गेल्यानंतर कदाचित या संदर्भात बैठक होईल, असेही काळे म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा