नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवर प्रस्तावित असलेल्या भावली पंप्ड स्टोरेज प्रकल्पावरून स्थानिक आदिवासींनी चिंता व्यक्त केली आहे. जंगल, जमीन आणि परंपरांवर होणाऱ्या परिणामांबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
भावली परिसरातील बेबीताई तेलाम यांचा प्रश्न केवळ घर आणि जमिनीपुरता मर्यादित नाही. ज्या जमिनीवर त्यांचं कुटुंब पिढ्यान् पिढ्या जगलं, जिथे त्यांचे देव आहेत आणि पूर्वजांना दफन करण्यात आलं आहे, तीच जमीन आता एका मोठ्या ऊर्जा प्रकल्पासाठी वापरली जाणार आहे, अशी त्यांची भावना आहे.
प्रकल्पाचं स्वरूप आणि जमिनीचा प्रश्न
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यांतील जामुंडे, काळभोंडे आणि कोथळे या गावांच्या परिसरात 1500 मेगावॅट क्षमतेचा भावली पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहे.
या प्रकल्पासाठी सुमारे 275 हेक्टर जमीन लागणार असून, त्यापैकी 243.74 हेक्टर वनजमीन आहे. प्रकल्पामुळे आपली जमीन, घरं आणि जंगल यांच्यावर परिणाम होईल, अशी चिंता स्थानिक आदिवासी व्यक्त करत आहेत.
दुसरीकडे, प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेलं नसून सध्या केवळ पूर्वतयारी सुरू असल्याचं जेएसडब्ल्यू कंपनीचं म्हणणं आहे. कंपनीच्या मते, या प्रकल्पामुळे 10 कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागणार आहे.
महाराष्ट्र सरकार आणि जेएसडब्ल्यू समूह यांच्यात 14 सप्टेंबर 2021 रोजी या प्रकल्पासाठी सामंजस्य करार झाला होता. पंप्ड स्टोरेज प्रकल्पात वीज उपलब्ध असताना पाणी खालच्या जलाशयातून वरच्या जलाशयात सोडलं जातं. विजेची मागणी वाढते, तेव्हा हे पाणी पुन्हा खाली सोडलं जातं आणि त्यातून वीज तयार केली जाते.
वनमंजुरी प्रलंबित; राज्यात 55 सामंजस्य करार
भावली धरण परिसरात या प्रकल्पासाठी काही हालचाली सुरू असल्याचं पाहणीत दिसलं. या ठिकाणी पोकलेन यंत्रं, जेएसडब्ल्यूचे कंटेनर आणि कंपनीचे कर्मचारी दिसले. मात्र, वनमंजुरीची दुसऱ्या टप्प्यातील परवानगी अद्याप प्रलंबित आहे.
महाराष्ट्रात भिरा इथे 1997 साली आणि घाटघर इथे 2008 साली पंप्ड स्टोरेज प्रकल्प उभारण्यात आले होते. मात्र त्यांची क्षमता कमी आहे. भिरा इथला प्रकल्प 150 मेगावॉट तर घाटघरचा प्रकल्प 250 मेगावॉट वीज साठवतो.
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्र सरकारनं राज्यात पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांसाठी किमान 55 सामंजस्य करार केले आहेत. त्यात टोरेंट, टाटा, अदानी, जेएसडब्ल्यू, एमईआयएल, ग्रीनको अशा खासगी कंपन्या आणि टीएचडीसी, एनटीपीसी सारख्या सरकारी कंपन्यांचा समावेश आहे.
भावली प्रकल्पाच्या परिसरातील हालचालींमुळे स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. घरं आणि जमीन गेल्यावर जगायचं कसं, असा प्रश्न आदिवासी कुटुंबं विचारत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा