परदेशातील तिजोऱ्यांमध्ये ठेवलेले सुमारे ६० हजार ८० किलो म्हणजेच ६०.०८ टन सोने रिझर्व्ह बँकेने प्रयत्न करून भारतात परत आणले आहे. मार्च ते सप्टेंबर २०२६ या गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत हे सोने देशात आणण्यात आले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी देशांतर्गत तिजोरीमध्ये ठेवलेल्या सोन्याचे प्रमाण वाढून सुमारे ८४ टक्क्यांवर पोहोचले आहे. मार्चअखेर हे प्रमाण ७७.२३ टक्के होते.
देशांतर्गत साठा ८४ टक्क्यांवर
रिझर्व्ह बँकेच्या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या सहामाही अहवालानुसार, ३० सप्टेंबर २०२६ अखेर भारताकडे ८८०.५२ टन सोन्याचा साठा होता. त्यापैकी ७४०.१३ टन सोने भारतातच ठेवलेले होते. दरम्यान, बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांच्याकडे परदेशात ठेवलेल्या भारतीय सोन्याच्या साठ्यात घट झाली आहे. मार्च २०२६ मध्ये परदेशात १९७.६७ टन सोने होते. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण कमी होऊन १४०.३९ टनांवर आले.
परदेशातील सोने का आणले जात आहे?
जागतिक स्तरावरील भू-राजकीय तणाव, आर्थिक अनिश्चितता आणि बदलती आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने सोन्याचा अधिकाधिक साठा देशांतर्गत तिजोरीमध्ये ठेवण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. या धोरणाचाच एक भाग म्हणून परदेशात ठेवलेले सोने टप्प्याटप्प्याने भारतात आणले जात आहे. त्यामुळे देशातील सोन्याचा साठा वाढत असून, परदेशातील साठा सातत्याने कमी होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा