नवी दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक शुक्रवारी सुरू झाली. आगामी विधानसभा निवडणुका आणि संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीत संघटनात्मक कामकाज, आगामी राजकीय कार्यक्रम आणि निवडणूक रणनीतीवर चर्चा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी समारोप सत्रात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
पाच सत्रांत विचारमंथन
ही बैठक पूसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या परिसरात आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून, सुमारे १०७ राष्ट्रीय पदाधिकारी, विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, प्रभारी आणि संघटनात्मक पदाधिकारी यात सहभागी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही बैठकीला उपस्थिती अपेक्षित आहे. दोन दिवसांत एकूण पाच सत्रांमध्ये विविध विषयांवर विचारमंथन होणार आहे.
२०२७ च्या निवडणुकांचा आढावा
२०२७ मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीचा आढावा, संघटनात्मक बांधणी, बूथस्तरावरील कामकाज आणि जनसंपर्क वाढविण्याच्या उपाययोजनांवर बैठकीत भर दिला जाणार आहे. संबंधित राज्यांतील राजकीय परिस्थिती आणि पक्षाच्या निवडणूक तयारीचे मूल्यमापनही केले जाणार आहे.
दरम्यान, ३० नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्ती विधेयकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची भूमिका आणि विरोधकांच्या आक्षेपांना उत्तर देण्याच्या रणनीतीवरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. नव्या राष्ट्रीय पदाधिकारी टीमची पंतप्रधानांसोबत होणारी ही दुसरी महत्त्वाची बैठक आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा