जायकवाडी धरणासाठी आपली २९ सुपीक गावे दिलेल्या शेवगाव तालुक्याला जनसंघर्षातून मिळालेले ३.८ टीएमसी पाणी हा तालुक्याचा कायदेशीर आणि नैतिक हक्क आहे. या हक्काच्या पाण्याचा एक थेंबही इतर तालुक्याकडे वळवू दिला जाणार नाही, असा खणखणीत इशारा ताजनापूर लिफ्ट सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष ॲड. शिवाजीराव काकडे यांनी प्रशासनाला दिला. शेवगावच्या हक्काचे पाणी इतरत्र वळवण्याच्या हालचालींना विरोध करण्यासाठी आणि पूर्व भागातील दुष्काळी २५ गावांतील पाझर तलाव वर्षातून चार वेळा शंभर टक्के क्षमतेने भरून मिळावेत, या मागणीसाठी कृती समितीने शुक्रवारी आक्रमक पवित्रा घेतला.
ॲड. काकडे आणि जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हर्षदा काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन सादर केले. या निवेदनासोबत पूर्व भागातील २५ गावांच्या ग्रामसभांचे ठरावही जोडण्यात आले. या निवेदनाच्या प्रती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि कार्यकारी अभियंता यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.
ताजनापूर लिफ्ट योजनेची सद्यस्थिती
जायकवाडी धरणातील राखीव ३.८ टीएमसी पाण्यातून १७ गावांसाठी ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक २ चे काम सध्या सुरू आहे. या टप्प्यासाठी २.२६७ टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे. ॲड. काकडे यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ४ जानेवारी २०२६ रोजी १.६१ टीएमसीच्या पुढील टप्प्याला मंजुरी दिली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यातील शिल्लक पाण्यातून शेवगावच्या २० आणि पाथर्डी तालुक्यातील २६ गावांना पाणी देण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याला कृती समितीने कडाडून विरोध केला असून, पाथर्डीसाठी शासनाने स्वतंत्र योजना आखावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.
कृती समितीच्या चार प्रमुख मागण्या
या आंदोलनात कृती समितीने चार प्रमुख मागण्या मांडल्या. पहिली मागणी अशी की, जायकवाडीतील ३.८ टीएमसी पाणी केवळ शेवगाव तालुक्यासाठीच वापरावे आणि त्यात पाथर्डी तालुक्यातील २६ गावांचा समावेश करू नये. दुसरी मागणी प्रस्तावित ताजनापूर लिफ्ट टप्पा क्रमांक ३ मध्ये शेवगावच्या २० गावांसह अंतरवाली बुद्रूक, अंतरवाली खुर्द, लखमापुरी, सोनविहीर आणि गायकवाड जळगाव या पाच गावांचा समावेश करून २५ गावांचा एकत्रित आराखडा तयार करण्याची आहे.
तिसरी मागणी पूर्व भागातील जमीन बरड आणि मुरुमाड असल्याने वर्षातून एकदा ७५ टक्के तलाव भरणे अयोग्य असल्याची आहे. तलाव आणि बंधाऱ्यांतील गाळ काढून खोलीकरण करावे आणि वर्षातून चार वेळा शंभर टक्के क्षमतेने पाण्याने भरून मिळावे, अशी मागणी करण्यात आली. चौथी मागणी सर्वेक्षणासाठी मंजूर एक कोटी रुपयांच्या निधीतून केवळ शेवगाव तालुक्याचे स्वतंत्र सर्वेक्षण जानेवारी २०२७ पर्यंत पूर्ण करण्याची आहे.
मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी हातात मागण्यांचे फलक घेऊन ‘आम्हाला पाणी मिळू द्या, पाणी आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’ आणि ‘अश्रू पुसा शेतकऱ्यांचे’ अशा घोषणा दिल्या. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, युवा नेते पृथ्वीसिंग काकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश भोसले, अशोक ढाकणे, सुनील गायके, विठ्ठलराव तांबे, माणिक गर्जे आणि प्रमोद तांबे यांच्यासह शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा