गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या वाटेवर असलेल्या सोने आणि चांदीच्या दरांनी शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यवहार दिवशी, जोरदार उसळी घेतली. दर तळाला गेल्यानंतर गेल्या दोन व्यवहार सत्रांमध्ये तेजीची उभारी पाहायला मिळाली असून सोन्याची किंमत पुन्हा १.२५ लाखांच्या पातळीवर पोहोचली आहे. चांदीच्या दरातही सातत्यानं वाढ सुरू आहे. सकाळी ९.४५ वाजता सोन्याचा भाव ३ टक्क्यांनी वधारला होता, तर चांदीच्या दरात त्याहून वेगानं वाढ झाली होती.
एमसीएक्सवर सोनं ३,४०० रुपयांनी महागलं
एमसीएक्सवर सोन्याचे वायदे ३,४०० रुपयांनी वाढून १.२५ लाखांवर पोहोचले, तर चांदीचे वायदे ८,००० रुपयांच्या वाढीसह १,५३,९४९ वर गेले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट सोन्याच्या किमतीत अंदाजे १.६ टक्के आणि चांदीच्या किमतीत अंदाजे ४.६ टक्के वाढ झाली, ज्याचा परिणाम देशांतर्गत वायदे बाजारावरही दिसून आला. गेल्या ३५ तासांत सोन्याच्या भावात ६.१५ टक्के आणि चांदीच्या भावात १४ टक्के वाढ झाली असून या तेजीमुळे अवघ्या दोन तासांत सोने आणि चांदीच्या बाजारात ७०० अब्ज डॉलर्सची, म्हणजे अंदाजे ६४.४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली.
दरवाढीमागे ही कारणं
गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या दिशेनं गेलेले माहिती-तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित समभाग आता स्थिरावले असून त्यामुळे सोने-चांदीच्या बाजाराला आधार मिळाला, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याशिवाय, गुंतवणूकदारांनी याआधी शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी सोने-चांदीची विक्री केलेली होती, ज्यामुळे दरांवर दबाव आला होता. मात्र आता विक्रीचा दबाव कमी झाल्यानं सोने-चांदीला आधार मिळाला आहे. अमेरिकेकडून अपेक्षेपेक्षा चांगली आर्थिक आकडेवारी आली असून डिसेंबरमध्ये फेडरल रिझर्व्ह व्याजदरात २५ बेसिस पॉईंट वाढ करेल, अशी चर्चा आहे. जानेवारीत आणखी एक दरवाढ होईल, ही बाजारातील दुसरी चिंताही आता दूर झाली आहे. त्याचवेळी, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार चीनसह जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून सतत सोने खरेदी सुरू आहे.
मात्र गेल्या काही दिवसांतील घसरणीमुळे गुंतवणूकदारांनी स्वस्ताईला भुलून चालणार नाही, असा इशाराही दिला जात आहे. अमेरिकेतील उच्च महागाईमुळे फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवेल, अशी भीती निर्माण झाली असताना व्याजदर वाढीमुळे सोन्याची झळाळी कमी आकर्षक बनते. अशा परिस्थितीत सध्याच्या तेजीतही बाजारातील अस्थिरता कायम राहू शकते. दरम्यान, सणासुदीच्या काळात घरातील जुनं सोनं एक्सचेंज करण्याबाबत ग्राहकांचा रस गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वाढला आहे. जस्टडायलच्या आकडेवारीनुसार या वाढीत जयपूर ७८ टक्क्यांसह आघाडीवर असून त्यानंतर दिल्लीत ६५ टक्के वाढ पाहायला मिळाली. पुणे आणि संपूर्ण भारत स्तरावर ५३ टक्के वाढ दिसून आली, तर मुंबई आणि बंगळुरूमध्ये अनुक्रमे ३४ आणि ९ टक्के वाढ नोंदवली गेली.
प्रतिक्रिया व्यक्त करा