साध्वी संजयच्या आक्रमक शतकाच्या जोरावर ग्लोरियस सीसीने एमसीए महिला क्रिकेट स्पर्धेत माटुंगा जिमखान्यावर १० धावांनी विजय मिळवला. साध्वीने १०८ चेंडूंत ११३ धावांची खेळी करत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. तिच्या या खेळीत १५ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. गोलंदाजीत रिद्धी सिंग आणि स्वरा जाधव यांनी प्रभावी कामगिरी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रथम फलंदाजी करताना ग्लोरियस सीसीने ३९ षटकांत तीन बाद २९८ धावा केल्या. साध्वीला आरोही बांबोडेने ८०, तर स्वरा जाधवने ४० धावा करत चांगली साथ दिली. त्यामुळे ग्लोरियस सीसीला मोठी धावसंख्या उभारता आली. माटुंगा जिमखान्याकडून संजम नटने तीन बळी घेतले.
गार्गी बांदेकरचे नाबाद शतक व्यर्थ
३९ षटकांत २९९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या माटुंगा जिमखान्यानेही जोरदार प्रतिकार केला. गार्गी बांदेकरने अवघ्या ६८ चेंडूंत नाबाद १०२ धावांची खेळी केली. तिच्या खेळीत १६ चौकारांचा समावेश होता. आया सुकाने ७१ धावा करत तिला साथ दिली. मात्र, निर्धारित षटकांत माटुंगा जिमखान्याला सात बाद २८९ धावांपर्यंतच मजल मारता आली. ग्लोरियस सीसीकडून रिद्धी सिंगने २१ धावांत तीन, तर स्वरा जाधवने ४० धावांत दोन बळी घेतले.
इतर सामन्यांत राजावाडी, वेंगसरकर फाउंडेशन विजयी
इतर सामन्यात भारत सीसीने प्रथम फलंदाजी करताना ४० षटकांत ९ बाद १४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात राजावाडी सीसीने २७.४ षटकांत ५ बाद १५० धावा करत पाच गडी राखून विजय मिळवला. राजावाडीकडून अक्षरा बहादूर सिनने ३२, तर तनिषा शर्माने ३१ धावा केल्या. भारत सीसीकडून आर्य दवणेने तीन, तर तनिषा शर्माने दोन बळी घेतले.
दुसऱ्या सामन्यात दिलीप वेंगसरकर फाउंडेशनने फोर्ट यंगस्टर्सवर सात गडी राखून मात केली. फोर्ट यंगस्टर्सचा डाव १५० धावांत आटोपला. सन्मय उपाशयने ७२, तर जान्हवी काटेने ३० धावा केल्या. दिलीप वेंगसरकर फाउंडेशनकडून मुद्रा खेडकरने तीन, तर फातिमा जाफर आणि रिद्धी ठक्कर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. प्रत्युत्तरात शाहीन रझाकच्या ७० आणि सिमरन शेखच्या ४६ धावांच्या जोरावर फाउंडेशनने तीन गडी गमावून विजयाचे लक्ष्य गाठले.
प्रतिक्रिया व्यक्त करा