नोव्हेंबर महिना संपत असताना राज्यातील हवामानात मोठा बदल जाणवू लागला आहे. हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही. संपूर्ण राज्यात कोरडे हवामान राहणार आहे. मात्र रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळेत थंडीचा कडाका अधिक जाणवणार आहे. राज्यात सध्या काही भागांत थंडीचा जोर कायम आहे, तर पूर्व विदर्भात गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
अंदाजानुसार राज्यात कमाल तापमान ३४ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत राहील, तर किमान तापमान १९ ते २२ अंशांपर्यंत घसरणार आहे. त्यामुळे दिवसा उबदार वातावरण राहील, पण रात्री आणि सकाळी थंडी जाणवेल.
मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका
मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, पुणे आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये किमान तापमान १० ते १५ अंशांपर्यंत घसरू शकते. या भागात रात्री आणि पहाटे थंडीचा कडाका जास्त वाढेल. दिवसभर कोरडे आणि सूर्यप्रकाशाचे हवामान राहील.
मराठवाडा आणि कोकणात कसे हवामान
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये कोरडे हवामान राहील. तेथील किमान तापमान १४ ते १८ अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे, तर दिवसा उबदार वातावरण राहणार आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्येही कोरडे हवामान राहील आणि निरभ्र आकाश पाहायला मिळेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा