सैराट चित्रपटातून एका रात्रीत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू आज मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीचे नाव आहे. अर्चीच्या भूमिकेने ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मात्र एवढी लोकप्रियता मिळूनही तिच्या घरात तिला कोणतीही खास वागणूक मिळत नाही, हे तिने स्वतः सांगितले आहे.
घरात मात्र साधीच रिंकू
अलीकडेच एका मुलाखतीत रिंकूने सांगितले की, ती आज कितीही मोठी अभिनेत्री असली तरी तिच्या घरचे वातावरण आधी होतं तसंच आहे. घरात तिला कोणी डोक्यावर घेत नाही किंवा राजकुमारीसारखी वागणूक दिली जात नाही. उलट, घरी असताना तिला झाडू मारणे, पुसणे अशी घरची कामे करावी लागतात. तिच्या मते, यश मिळालं म्हणजे घरातलं स्थान बदलत नाही.
आई-वडिलांकडून जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न
रिंकूचे आई-वडील तिच्या यशाने आनंदी आहेत, पण ते तिला नेहमी जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करतात. तिच्या कामाचा त्यांना अभिमान आहे, मात्र मिळालेलं यश ही फक्त सुरुवात असल्याची जाणीव ते तिला सतत करून देतात. आई-वडील दोघेही शिक्षक असल्याने घरात वाचन आणि अभ्यासाला विशेष महत्त्व दिलं जातं. घरात चित्रपट, पुस्तकं आणि समाजातील घडामोडींवर चर्चा होते, आणि याच वातावरणाने तिच्या विचारांवर चांगले संस्कार झाले आहेत, असं रिंकू म्हणाली.
नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने तिकीटबारीवर मोठं यश मिळवलं आणि रिंकूला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. त्यानंतर कागर, मेकअप आणि झुंड यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. कमी वयात मोठं यश मिळवूनही तिने आपला साधेपणा जपला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा