कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळाली असून प्रकल्पाच्या दृष्टीने आज एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. प्रकल्प कार्यालय आणि संमती नोंदणी केंद्राचे उद्घाटन खासदार मिलिंद देवरा, खासदार अरविंद सावंत आणि आमदार अमीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. याचबरोबर प्रकल्पातील रहिवासी, भाडेकरू आणि लाभार्थ्यांना भविष्यात उपलब्ध होणाऱ्या सदनिकांचे स्वरूप प्रत्यक्ष पाहता यावे, यासाठी उभारण्यात आलेल्या नमुना सदनिकेचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सुविधांमुळे प्रकल्पाशी संबंधित नागरिकांना नोंदणी, माहिती आणि पुनर्वसन प्रक्रियेबाबत मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे.
कामाठीपुरा गल्ली क्रमांक १ येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य अभियंता अनिल अंकलगी, म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे, मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, विकासक अमृत गोयल, नगरसेविका नसीमा जुनेजा यांच्यासह कामाठीपुरा विकास समितीचे पदाधिकारी, स्थानिक रहिवासी, भाडेकरू, जमीनमालक आणि विविध घटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्पाची व्याप्ती मोठी
सुमारे ३४ एकर क्षेत्रावर प्रस्तावित असलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या कक्षेत सुमारे ९४३ सेस आणि ३४९ नॉन-सेस इमारतींचा समावेश आहे. या प्रकल्पाशी ८,००० हून अधिक रहिवासी व भाडेकरू संबंधित असून त्यामध्ये सुमारे ६,६२५ निवासी आणि १,३७६ व्यावसायिक भाडेकरूंचा समावेश आहे. याशिवाय सुमारे ८०० जमीनमालक या प्रकल्पाशी निगडित आहेत. पुनर्विकासाच्या माध्यमातून विद्यमान रहिवासी व भाडेकरूंचे नियोजित पुनर्वसन करण्याबरोबरच सुमारे ४,५०० अतिरिक्त गृहनिर्माण सदनिकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे.
हा प्रकल्प म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मधील विनियम ३३(९) अंतर्गत राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाला नोडल एजन्सी तसेच विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून दर्जा देण्यात आला आहे. प्रकल्पाच्या प्रत्यक्ष विकासाची अंमलबजावणी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी मार्फत करण्यात येणार आहे.
पुढील टप्पे आणि वेळापत्रक
याप्रसंगी खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, दक्षिण मुंबईतील प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे ८,००० भाडेकरू आणि रहिवाशांचे ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या पुनर्वसन सदनिकेत विनामूल्य पुनर्वसन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. कामाठीपुरा समूह पुनर्विकास हा केवळ जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रकल्प नसून या ऐतिहासिक परिसराचे सर्वांगीण परिवर्तन घडवून आणण्याचा व्यापक प्रयत्न असल्याचेही देवरा यांनी सांगितले.
खासदार अरविंद सावंत म्हणाले की, कामाठीपुरातील भाडेकरू आणि रहिवाशांचे स्वप्नवत घर साकारण्याची मुहूर्तमेढ आज प्रकल्प कार्यालयाचे उद्घाटन करून झाली आहे. संपूर्ण देशाला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने हा पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात यावा, असे त्यांनी सांगितले. आमदार अमीन पटेल यांनी भाडेकरू, रहिवासी आणि जमीन मालकांनी लवकरात लवकर संमतीपत्र देऊन प्रकल्पाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, या प्रकल्पाला गती देण्यासाठी भाडेकरू, रहिवासी व जमीन मालकांची ५१ टक्के संमती आवश्यक आहे. येत्या ७ डिसेंबर २०२६ पर्यंत जास्तीत जास्त भाडेकरू, रहिवासी व पात्र जमीन मालकांनी संमती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. संमती मिळाल्यानंतर बृहत आराखड्याची मंजुरी, पर्यावरण विभागाच्या परवानग्या, उच्चाधिकार समितीची आणि नगर विकास विभागाची परवानगी ही पुढील कामे तात्काळ केली जातील. जानेवारी २०२७ अखेरपर्यंत परवानग्यांची प्रक्रिया पूर्ण करून फेब्रुवारी २०२७ मध्ये प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचा मानस असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा