जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीमध्ये एकही जागा न मिळाल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीमुळे ते पक्ष सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपयोग झाला नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आता मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
## जिल्हा बँक निवडणुकीवरून नाराजी
जळगाव जिल्ह्यात पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चंद्रकांत पाटील हे शिवसेनेचे आमदार असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपावरून ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. या नाराजीची दखल घेत एकनाथ शिंदे म्हणाले की, चंद्रकांत पाटील हेदेखील आमचा परिवारच आहेत. काही नाराजी असेल तर त्यांच्याशी चर्चा केली जाईल. त्यांच्याशी मी स्वतः बोलतो. परिवार आहे, कुटुंब आहे आमचे, त्यांची जी काही अडचण असेल ती सोडवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
## दुष्काळावर सरकारची भूमिका
यावेळी बोलताना शिंदे यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवरही भाष्य केले. यावेळचा दुष्काळ मोठा आहे आणि संकटही मोठे आहे, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागे सरकार मोठ्या ताकदीने उभे आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुष्काळ जाहीर करण्यात आला असून संपूर्ण मंत्रिमंडळ शेतकऱ्यांच्या बांधावर गेले. शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम मदत जमा झाली आहे. पाणी आणि जनावरांना चारा देण्याचे काम सरकार करत असून शिवसेनादेखील शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा