सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनवर दरोडा टाकल्याची घटना नवी मुंबईतील जुईनगर एमआयडीसी परिसरात घडली आहे. या दरोड्यात १६ किलोहून अधिक सोने लुटल्याचा प्राथमिक अंदाज असून या सोन्याची किंमत जवळपास २० कोटी रुपये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
रात्रीच्या वेळी व्हॅन अडवून दरोडा
मिळालेल्या माहितीनुसार जुईनगर एमआयडीसी परिसरातील सर्व्हिस रोडवर रात्रीच्या वेळी सोन्याची वाहतूक करणाऱ्या व्हॅनला चार जणांच्या टोळीने लक्ष्य केले. आरोपी वॅगनआर कारमधून आले होते. त्यांनी सोने घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना रस्त्यात अडवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मारहाण करून व्हॅनमधील सोने लुटल्याचा आरोप आहे. दरोडा टाकल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेत मोठ्या प्रमाणात सोने लुटण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
पोलीस तपास सुरू
पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार १६ किलोपेक्षा अधिक सोने आरोपींनी लंपास केले असावे. या सोन्याची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत सुमारे २० कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. मात्र, लुटलेल्या सोन्याचे नेमके वजन आणि किंमत तपासानंतर स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेसह संबंधित पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. या धाडसी दरोड्यामुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा