केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजुरीसाठी आणणार आहे. दोन्ही सभागृहांत हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू आहेत. या विधेयकाला शरद पवार यांचा पक्ष पाठिंबा देऊ शकतो, असे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तर आम्ही या विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगून टाकले आहे. असे असताना पवार गटातून आव्हाड यांच्या मताशी विसंगत भूमिका समोर आली आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी आव्हाड यांच्या मतापेक्षा वेगळे मत मांडले आहे. त्यामुळे पक्षात नेमके काय घडत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मसुदा वाचल्याशिवाय निर्णय नाही
आव्हाड यांनी याबाबत माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना अजून हा निर्णय झालेला नसल्याचे अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्रिमंडळाने विधेयक मंजूर केल्यानंतर माध्यमांत तीन मुद्दे समोर आले. कदाचित याच तीन मुद्द्यांवरून जितेंद्र आव्हाड यांनी विधान केले असावे, असे कोल्हे म्हणाले. परंतु विधेयकाचा मसुदा जोपर्यंत हातात येत नाही आणि तो मसुदा जोपर्यंत पूर्ण वाचला जात नाही, तोपर्यंत कोणताही निर्णय होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
विधेयकाचा मसुदा समोर आल्यानंतर सर्व खासदार एकत्र बसून चर्चा करतील. त्यानंतर पक्षनेतृत्त्वाशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही कोल्हे यांनी सांगितले. पक्षाने व्हिप जारी केला आहे. हा व्हिप विशेष अधिवेशनाला उपस्थित राहण्याबाबत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अजूनही मसुदा आलेला नाही, मग निर्णय कसा होईल, असा सवालही त्यांनी केला.
एप्रिलमधील विरोध आणि आताची स्थिती
एप्रिल महिन्यात हे विधेयक आले होते, त्यावेळी त्याला विरोध करण्यात आला होता. कारण त्यात लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना होईल, अशी तरतूद होती. या तरतुदीमुळे दक्षिणेतील राज्यांना मोठा फटका बसणार होता. सरसकट ५० मतदारसंघ वाढले तर यावर विचार करू, अशी काँग्रेसची भूमिका त्यावेळी होती. माध्यमांतील माहितीनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या विधेयकात सरसकट ५० टक्क्यांची अट आहे. त्यामुळे विधेयक जेव्हा संसदेत मांडले जाईल, ते वाचल्याशिवाय निर्णय कसा घेता येईल, अशी रोखठोक भूमिका अमोल कोल्हे यांनी मांडली. त्यामुळे आता शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष नेमकी काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा