नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या यादीवरून भारतीय जनता पक्षामध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. नाशिक महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवड प्रक्रियेतील पक्षाच्या संभाव्य उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना न दिल्यामुळे शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. दुसरीकडे, सुनील केदार यांनी याबाबत मौन बाळगल्याने सस्पेन्स कायम होता. अखेर याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचा खुलासा दिला आहे.
राजीनामा घेतल्याची माहिती
भारतीय जनता पक्षाचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. एकीकडे सुनील केदार यांनी आपल्यावर कुठलीही कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट केले होते, तर दुसरीकडे पालकमंत्र्यांनी हा नवा खुलासा केला आहे. नाशिक महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची यादी शहराध्यक्ष सुनील केदार यांनी परस्पर जाहीर केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. यादी परस्पर जाहीर केल्याने पक्षात नाराजी होती. या नाराजीनंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्याचे सांगितले जात आहे.
नव्या शहराध्यक्षांकडे लक्ष
सुनील केदार यांचा राजीनामा घेतल्यानंतर पक्षाचा नवीन शहराध्यक्ष आता कोण असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राजीनाम्यानंतर शहराध्यक्षपदासाठी फिल्डिंग सुरू झाली आहे. सुनील केदार यांच्या जागी शहराध्यक्ष म्हणून पाच नावांची सध्या चर्चा आहे. यामध्ये माजी शहराध्यक्ष प्रशांत जाधव, गिरीश पालवे, विक्रांत चांदवडकर, लक्ष्मण सावजी आणि निलेश बोरा यांच्या नावांचा समावेश आहे. आता सुनील केदार यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा