उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाला जोडणारी नवीन एक्स्प्रेस लवकरच सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नव्या गाडीची घोषणा केली. भुसावळ आणि नागपूर या दोन स्थानकांदरम्यान ही एक्स्प्रेस धावणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टद्वारे दिली. केंद्र सरकारने या नव्या एक्स्प्रेसला मंजुरी दिली आहे.
## मंजुरी आणि मुख्यमंत्र्यांचे आभार
एक्स्प्रेस मंजूर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. महाराष्ट्रातील जनतेची मागणी मान्य करत भुसावळ ते नागपूर दरम्यान नवीन एक्स्प्रेस सुरू करण्यास मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. या नवीन गाडीमुळे राज्यातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुलभ रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. भुसावळ–नागपूर दरम्यान ही गाडी कधीपासून धावणार, याबाबत सविस्तर माहिती अद्याप समोर आलेली नाही.
## संभाव्य मार्ग आणि थांबे
ही गाडी नेहमीच्या अकोला–बडनेरा–वर्धा या थेट विदर्भ मार्गाऐवजी भुसावळ–खंडवा–इटारसी–बैतूल–आमला–पांढुर्णा–नागपूर या मध्य प्रदेशातून जाणाऱ्या मार्गाने धावण्याची शक्यता आहे. अपेक्षित थांब्यांमध्ये भुसावळ जंक्शन, बुरहानपूर, नेपानगर, खंडवा जंक्शन, तलवडिया, छनेरा, खिरकिया, हरदा, टिमरनी, इटारसी जंक्शन, घोडाडोंगरी, बैतूल, आमला जंक्शन, मुलताई, पांढुर्णा, नरखेड, काटोल आणि नागपूर जंक्शन यांचा समावेश आहे. रेल्वे मंत्रालयाने या गाडीच्या परिचालनाला अधिकृत हिरवा कंदील दाखवला असून, सुरू होण्याची नेमकी तारीख, आठवड्याचे दिवस आणि सविस्तर वेळापत्रक मध्य रेल्वेकडून लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा