राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस केल्यानंतर आव्हाडांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पवारांच्या तब्येतीविषयी माहिती दिली, तसेच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर पवारांची भूमिका स्पष्ट केली.
डिलिमिटेशन घटनात्मक असल्याचे मत
आव्हाड यांच्या मते, शरद पवार रुग्णालयातही ताजेतवाने दिसत होते आणि नेहमीप्रमाणे ते फिरायला गेले होते. या भेटीदरम्यान त्यांनी डिलिमिटेशनबद्दलही आपले मत मांडले. आव्हाड म्हणाले की, डिलिमिटेशन हे घटनात्मक असते आणि त्याला काही पर्याय नसतो, असे शरद पवारांनी अनौपचारिक चर्चेत सांगितले होते. तसेच, आपापले मतदारसंघ बांधायला शिका, असा सल्लाही पवारांनी दिल्याचे आव्हाडांनी नमूद केले.
आव्हाडांनी व्यक्त केली निष्ठा
जितेंद्र आव्हाडांनी आपली पवारांप्रतीची निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित केली. साहेब हे माझे दैवत आहेत, माझ्या दैवताची भूमिका ती माझी भूमिका, असे ते म्हणाले. १९८६ सालापासून आपण पवारांसोबत असल्याचे सांगत, त्यांनी गद्दारी केली नाही, यावर त्यांनी भर दिला. प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील यांनीही यापूर्वी पवारांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती.
प्रतिक्रिया व्यक्त करा