२०२६ या वर्षाचा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरू होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. डिसेंबरमध्ये तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण डिसेंबर महिन्यात रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार तसेच ख्रिसमस आणि काही राज्यांमध्ये स्थानिक सणांमुळे बँकांना सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकेच्या शाखेत जाण्याआधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) हॉलिडे कॅलेंडर तपासणे महत्त्वाचे आहे.
डिसेंबरमध्ये किती दिवस बँका बंद राहणार?
डिसेंबर २०२६ मध्ये देशातल्या बँकांना नियमित साप्ताहिक सुट्ट्या असतील. ६, १३, २० आणि २७ डिसेंबर रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. तसेच १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि २६ डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने बँकांच्या शाखांमध्ये कामकाज होणार नाही. २५ डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त देशभर बँकांना सुट्टी असेल. तसेच काही राज्यांमध्ये स्थानिक सण आणि विशेष दिवसांमुळे जास्तीच्या सुट्ट्या असतील.
डिसेंबरमध्ये सिक्कीम आणि मेघालयमधल्या बँकांना सर्वाधिक सुट्ट्या असतील. सिक्कीममध्ये ९, १० आणि ११ डिसेंबर रोजी लोसूंग आणि नामसूंग उत्सवामुळे बँका बंद राहतील. तर मेघालयमध्ये १८ डिसेंबरला यू सोसो थाम पुण्यतिथी, २४ डिसेंबरला ख्रिसमस ईव्ह आणि ३० डिसेंबरला यू कियांग नांगबाह पुण्यतिथी असल्यामुळे सुट्टी असेल. तसेच १ डिसेंबरला अरुणाचल प्रदेश, ३ डिसेंबरला गोवा, १९ डिसेंबरला गोवा, २४ डिसेंबरला मिझोराम, नागालँड आणि मेघालय, तर ३१ डिसेंबरला मिझोराममध्ये बँका बंद राहतील.
ऑनलाइन व्यवहार सुरू राहणार
बँकांच्या शाखांना सुट्टी असली तरी ग्राहकांच्या ऑनलाइन बँकिंग सेवा सुरू राहतील. UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग आणि ATM च्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करता येतील. तसेच NEFT आणि RTGS सुविधांचाही ऑनलाइन वापर करता येईल. त्यामुळे चेक क्लिअरन्स, केवायसी, डिमांड ड्राफ्ट किंवा इतर महत्त्वाची कामे असतील तर ती सुट्ट्यांआधी पूर्ण करा. महत्त्वाचे म्हणजे, बँकांच्या सुट्ट्या राज्यानुसार वेगवेगळ्या असू शकतात. त्यामुळे आपल्या शहरातल्या आणि बँकेच्या शाखेतल्या सुट्टीची माहिती अधिकृत RBI हॉलिडे कॅलेंडरवर तपासूनच बँकेत जा.
प्रतिक्रिया व्यक्त करा