देशभरात गिग आणि प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या लाखो कामगारांसाठी केंद्र सरकार लवकरच मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या अखेरीस या कामगारांसाठी पेन्शन योजना, आरोग्य विमा, मातृत्व लाभ आणि अपंगत्व संरक्षण यांसारख्या सामाजिक सुरक्षा सुविधा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
या निर्णयाचा देशातील जवळपास १५ लाख गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांना फायदा होऊ शकतो. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना या योजनांचे प्राथमिक लाभार्थी मानले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्लॅटफॉर्म कंपन्यांच्या माध्यमातून पोर्टलवर नोंदणी केलेल्या कामगारांना पेन्शनसोबत इतर सामाजिक सुरक्षा सुविधांचा लाभ मिळू शकतो.
कंपन्यांकडून दोन टक्के योगदानाचा प्रस्ताव
या सामाजिक सुरक्षा निधीसाठी कंपन्यांकडून आर्थिक योगदान घेण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यामध्ये दोन पर्यायांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पहिल्या पर्यायानुसार प्लॅटफॉर्म कंपन्यांना त्यांच्या एकूण उलाढालीच्या जवळपास दोन टक्के रक्कम निधीत जमा करावी लागू शकते, तर दुसऱ्या पर्यायानुसार प्रत्येक व्यवहाराच्या मूल्याच्या सुमारे दोन टक्के योगदान देण्याचा पर्याय आहे.
राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळात चर्चा होणार
या योगदानाच्या प्रारूपावर राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा होईल, अशी शक्यता आहे. ही बैठक पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला होऊ शकते. मंडळाचे सदस्य दीपक जैस्वाल यांनी सरकारने या निधीसाठी अर्थसंकल्पीय तरतूद करावी, अशी सूचना केली आहे. कंपन्यांनी योगदानाचा आर्थिक भार कामगारांवर टाकू नये आणि त्यांच्या प्रोत्साहन रकमेवर किंवा प्रत्येक ऑर्डरच्या मोबदल्यावर परिणाम होऊ नये, याची काळजी घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. स्विगी, झोमॅटो, उबर, ओला, रॅपिडो, प्रोंटो, स्नॅबिट आणि अर्बन कंपनी अशा मोठ्या प्लॅटफॉर्मशी संबंधित कामगारांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो. या कंपन्यांनी आपल्या कामगारांची माहिती सरकारसोबत शेअर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा