रोहित पवार यांनी काल सुनेत्रा पवार यांच्याबद्दल वक्तव्य केले. पुण्याला कठोर पालकमंत्री देण्याची गरज आहे. सुनेत्रा वहिनींना अजितदादांसारखे काम येत नाही, असे मोठे विधान काल रोहित पवार यांनी केले. त्याविरोधात आज अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
## सुप्रिया सुळे यांची भूमिका
सुळे म्हणाल्या की, काल रोहित पवारांनी जे वक्तव्य केले, त्यावर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. एकदा रोहितने दिलगिरी व्यक्त केल्यावर, सॉरी म्हटल्यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून कोणी आंदोलन करत असेल, तर माझी त्यांना विनंती आहे की, आपण एकाच ताटात जेवलो आहोत. त्यांच्यापर्यंत रोहितने सॉरी म्हटल्याची ही माहिती कोणी पोहोचवली नसेल. मी अंतकरणापासून विनंती करते की, रोहितकडून काल अनावधनाने कमी-जास्त वाक्य गेले असेल तर दिलगिरी व्यक्त केली आहे. दिलगिरी व्यक्त केल्यावर विषय संपतो. त्यांची इच्छा असेल तर मी रोहितच्या वतीने त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी अंतकरणातून हात जोडून विनंती करते. हे पक्षाचे धोरण नाही. मी सॉरी म्हणते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
## वाद वाढवण्यात रस नाही
आमचा असा कुठलाही हेतू नाही. रोहितने दिलगिरी व्यक्त केली आहे. विषय वाढवायचा असेल तर मला विषय वाढवण्यात इंटरेस्ट नाही. व्हॉट इज प्रॉब्लेम. मी त्यांच्या भावनांचा आदर करते, सॉरी म्हणते. अजून काही हवे असेल तर मी ते ही करीन, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुनेत्रा पवार या अजित पवार माझ्या मोठ्या भावाची बायको आहे. ज्या संस्कारात पवारांच्या घरात मी वाढले, तिथे वयाने, पदाने मोठ्या असलेल्या कुठल्याही व्यक्तीच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करते. मला त्यात काही कमीपणा वाटत नाही, असेही त्या म्हणाल्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा