अनेकदा पोटदुखी, अपचन, भूक न लागणं किंवा अचानक वजन कमी होणं अशा समस्यांकडे आपण फारसं लक्ष देत नाही. पचनाचा त्रास असेल किंवा खाण्यापिण्यात बदल झाल्यामुळे असं होत असेल, असा विचार करून आपण या तक्रारींकडे दुर्लक्ष करतो. पण ही लक्षणं काही वेळा गंभीर आजाराची चिन्हं असू शकतात. स्वादुपिंडाचा कर्करोग हा त्यापैकीच एक आजार आहे.
या कॅन्सरची सुरुवातीला ठळक लक्षणं दिसत नसल्याने अनेकदा रुग्णांना आजाराचं निदान होण्यास उशीर होतो. सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अखिला बोम्मारेड्डी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्या तळेगाव येथील टीजीएच ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये कार्यरत आहेत.
सुरुवातीची लक्षणं ओळखणं का कठीण?
डॉ. बोम्मारेड्डी यांच्या मते, स्वादुपिंडाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं ओळखणं कठीण असतं. पोटात अस्वस्थ वाटणं, अपचन, भूक कमी होणं आणि थकवा जाणवणं या समस्या इतर सामान्य आजारांमध्येही दिसतात. त्यामुळे अनेकजण या लक्षणांना साधा पचनाचा त्रास समजतात. परिणामी डॉक्टरांकडे जाण्यास उशीर होतो आणि आजाराचं निदानही लांबणीवर पडतं.
स्वादुपिंड हा पोटाच्या आतील बाजूला खोलवर असतो. त्यामुळे केवळ शरीराची सामान्य तपासणी करून त्यामध्ये गाठ आहे की नाही, हे समजणं कठीण असतं. तसंच सर्वसामान्य लोकांची नियमित तपासणी करून स्वादुपिंडाचा कॅन्सर शोधण्यासाठी सध्या कोणतीही विशेष चाचणी मोठ्या प्रमाणावर सुचवली जात नाही. त्यामुळे अनेकदा आजाराची लक्षणं स्पष्ट झाल्यानंतर किंवा इतर कारणांसाठी तपासण्या केल्यानंतरच कॅन्सरचं निदान होतं.
कोणती लक्षणं दिसतात?
आजार वाढू लागल्यानंतर त्याची काही लक्षणं स्पष्टपणे दिसू लागतात. यामध्ये सतत पोट दुखणं, पोटातील वेदना पाठीपर्यंत जाणं, कोणतंही कारण नसताना वजन कमी होणं, भूक न लागणं, मळमळणं आणि शौचाच्या सवयींमध्ये बदल होणं अशा त्रासांचा समावेश होतो.
काही रुग्णांच्या त्वचेचा आणि डोळ्यांच्या पांढऱ्या भागाचा रंग पिवळसर होतो. यालाच कावीळ म्हणतात. स्वादुपिंडामध्ये गाठ तयार झाल्यामुळे पित्तनलिकेत अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कावीळ होण्याची शक्यता असते. याशिवाय लघवीचा रंग गडद होणं आणि शौचाचा रंग फिकट होणं अशी लक्षणंही दिसू शकतात.
एखाद्या व्यक्तीला आधीपासून मधुमेह नसताना अचानक मधुमेहाचं निदान झालं आणि त्याच वेळी वजनही कमी होत असेल, तर या लक्षणांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. काही वेळा अशा बदलांचा संबंध स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी असू शकतो. त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा