जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर अभिजित दिपके यांनी घेतलेल्या आक्षेपावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी कुणाला फोन केला, याचे उत्तर तेच देऊ शकतात, असे पाटील म्हणाले. हा प्रश्न मंगेश चव्हाण यांनाच विचारला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक अधिकाऱ्यांच्या तक्रारीवर काय म्हणाले पाटील
आमदार किशोर पाटील हे जिल्हा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याच्या मुद्द्यावरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. किशोर पाटील यांना शंका वाटत असेल, तर त्यांनी तक्रार करावीच, असे पाटील म्हणाले. त्याचबरोबर मुक्ताईनगरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. नाराजी दूर करण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले जात आहेत, असे पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांना जागा मिळायला हवी होती, मात्र सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत, असे ते म्हणाले. जागा मिळाली नाही म्हणून त्यांच्या मनात नाराजी असणे स्वाभाविक असून, ती दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
संजय राऊत आणि अध्यक्षपदाबाबतची भूमिका
संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, राऊत यांच्याकडे आता इतरांना उपाध्या देण्याशिवाय दुसरे काम उरलेले नाही. जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत — भाजपचा अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष अशी चर्चा सुरू असल्याच्या प्रश्नावर पाटील म्हणाले की, आधी निकाल येऊ द्यावेत. निकालानंतर सर्वजण बसून सामोपचाराने चर्चा करून निर्णय घेतला जाईल. राष्ट्रवादी शरद पवार गटाने सर्व खासदारांना व्हीप बजावल्याच्या मुद्द्यावर पाटील म्हणाले की, अधिवेशनापूर्वी प्रत्येक पक्ष आपल्या आमदार-खासदारांना व्हीप बजावत असतो आणि त्यांना हजर राहावे लागते. त्याच पद्धतीने राष्ट्रवादी शरद पवार गटानेही व्हीप बजावला असेल, असे ते म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा