पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असताना जगातील काही देशांमध्ये मात्र हे इंधन अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, काही देशांमध्ये एक लिटर डिझेलची किंमत एक रुपयापेक्षाही कमी आहे. लिबिया, इराण आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल मिळते. दुसरीकडे, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर याच्या तुलनेत कितीतरी जास्त आहेत. ग्लोबल पेट्रोल प्राइसेसच्या आकडेवारीनुसार, लिबियामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर अवघा २.१५ रुपये आहे. इराणमध्ये पेट्रोलसाठी २.६५ रुपये, तर व्हेनेझुएलामध्ये ३.२५ रुपये मोजावे लागतात.
एक रुपयापेक्षाही कमी दरात डिझेल
डिझेलच्या बाबतीत तर चित्र आणखी आश्चर्यकारक आहे. व्हेनेझुएलामध्ये एक लिटर डिझेलची किंमत केवळ ३९ पैसे, तर इराणमध्ये ५३ पैसे आहे. म्हणजेच या दोन्ही देशांमध्ये एक रुपयापेक्षाही कमी दरात डिझेल मिळते. लिबियामध्ये डिझेलचा दर प्रति लिटर २.१५ रुपये आहे. भारतातील सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेलचा विचार केला, तर अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअरमध्ये इंधनाचे दर सर्वात कमी आहेत. येथे पेट्रोल ८८.६६ रुपये, तर डिझेल ८४.५६ रुपये प्रति लिटर दराने मिळते.
सर्वात महाग पेट्रोल कुठे? दरात तफावत का?
एका बाजूला काही देशांमध्ये पेट्रोलचे दर अगदी मोजक्या रुपयांमध्ये आहेत, तर दुसरीकडे काही देशांमध्ये वाहनधारकांना पेट्रोलसाठी मोठी किंमत मोजावी लागते. हाँगकाँगमध्ये जगातील सर्वात महाग पेट्रोल मिळते. येथे एक लिटर पेट्रोलसाठी तब्बल ४१०.७५ रुपये खर्च करावे लागतात. या यादीत मलावी दुसऱ्या क्रमांकावर असून, तेथे पेट्रोलचा दर ३००.६८ रुपये प्रति लिटर आहे. भारतातील सर्वाधिक पेट्रोल दराचा विचार केल्यास आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे पेट्रोलची किंमत ११८.३४ रुपये प्रति लिटर आहे. पेट्रोलप्रमाणेच डिझेलच्या दरातही हाँगकाँग आघाडीवर आहे. येथे एका लिटर डिझेलसाठी तब्बल ४४१.६३ रुपये मोजावे लागतात. मलावीमध्ये डिझेलचा दर ३१३.७५ रुपये प्रति लिटर आहे. भारतात आंध्र प्रदेशातील चित्तूर येथे डिझेल सर्वाधिक महाग असून, त्यासाठी वाहनधारकांना १०६.०६ रुपये प्रति लिटर खर्च करावे लागतात. वेगवेगळ्या देशांमध्ये इंधनाच्या किमतीत एवढी तफावत का? कच्च्या तेलाचे उत्पादन, सरकारी अनुदान, कररचना, आयात-निर्यातीवरील निर्बंध आणि स्थानिक बाजारपेठेतील मागणी या घटकांचा इंधनाच्या दरांवर थेट परिणाम होतो. सामान्यतः तेल उत्पादक आणि तुलनेने कमी उत्पन्न असलेल्या काही देशांमध्ये इंधन स्वस्त मिळते. याउलट, अनेक विकसित देशांमध्ये कर आणि इतर शुल्कांमुळे पेट्रोल-डिझेल महाग असते. मात्र, अमेरिका याला अपवाद आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा