पुण्यात दरवर्षी तीन लाख नव्या वाहनांची भर पडत आहे. मात्र, रस्त्यांच्या क्षेत्रफळात गेल्या दशकभरात भरीव वाढ झालेली नाही. शहरातील ८० टक्क्यांहून अधिक वाहतूक प्रमुख रस्त्यांवरच असल्याने पर्यायी रस्त्यांची उभारणी अपरिहार्य झाली आहे. प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीने क्षमतेची मर्यादाही ओलांडली आहे. आताच ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर २०४५ पर्यंत तीव्र वाहतूक कोंडी होणाऱ्या रस्त्यांची संख्या दुप्पट होण्याचा अंदाज महापालिकेने वर्तवला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दर हजार नागरिकांमागे ७८२ खासगी वाहने आहेत. सार्वजनिक वाहतुकीचा वाटा अवघा १९ टक्के आहे. मुंबई महानगर प्रदेशात हेच प्रमाण ७० टक्के आहे. पुण्यात दहा किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे लागतात. देशातील सात प्रमुख महानगरांच्या तुलनेत पुण्यातील रस्त्यांची घनताही सर्वांत कमी आहे. पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये प्रति चौरस किलोमीटर रस्त्यांची लांबी अवघी ३.५० किलोमीटर आहे, तर मुंबईत ती ८.२० किलोमीटर आहे. बस प्रवाशांची संख्याही दशकभरापासून जैसे थे आहे.
३६ प्रकल्पांचा कृती आराखडा
या संकटातून पुण्याची सुटका करण्यासाठी महापालिकेने पाच भुयारी मार्ग, ३०० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे आणि सहा उन्नत मार्गांसह ३६ प्रकल्पांचा कृती आराखडा तयार केला आहे. पुणे अर्बन स्ट्रीट्स – रोड इन्फ्रा अँड मोबिलिटी समिट २०२६ मध्ये महापालिकेच्या पथ विभागाचे मुख्य अभियंता राजेश बनकर आणि प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता दिनकर गोजारे यांनी प्रस्तावित प्रकल्पांचे सादरीकरण केले.
शहरातील अवघ्या १२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे तुटलेले दुवे जोडल्यास ६० किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे खुले होईल. महापालिकेने असे ३३ दुवे शोधले असून, त्यांच्या सक्तीच्या भूसंपादनासाठी प्रथमच ३०० कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे. त्यापैकी १४ ठिकाणी भूसंपादन झाले असून, नऊ रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. याशिवाय ३२ प्रमुख रस्त्यांचा कायापालट, ३० प्रमुख चौकांची पुनर्रचना, ३७ वाहतुकीतील अडथळ्यांचे निराकरण आणि ७० कोटी रुपयांतून १०० किलोमीटरच्या पदपथांची सुधारणा प्रस्तावित आहे. भोसरी ते उंड्री, राम नदी ते राजाराम पूल, हिंगणे ते पद्मावती, पाषाण ते कोथरूड आणि वडकी ते पुरंदर विमानतळ असे पाच भुयारी मार्गही या आराखड्यात आहेत.
एचसीएमटीआर आणि पार्किंग शुल्काचे नियोजन
शहराच्या विकास आराखड्यात १९८७ पासून असलेल्या ३६.२ किलोमीटर लांबीच्या एचसीएमटीआरचा वापर केवळ सार्वजनिक वाहतुकीसाठी करण्याचा पर्याय महापालिकेने मांडला आहे. पुण्याभोवती तीन वर्तुळाकार रस्त्यांची उभारणी प्रस्तावित असल्याने एचसीएमटीआरच्या मूळ स्वरूपात बदल करण्याचा विचार पुढे आला आहे.
दुसरीकडे शहरातील जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लक्ष्मी रस्ता, विमाननगर, बिबवेवाडी रस्ता आणि बाणेर हायस्ट्रीटवरील पार्किंगसाठी शुल्क आकारण्याचे नियोजन आहे. एक ते दोन तासांसाठी वाहन उभे करण्याची मुभा असेल. निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ वाहन उभे केल्यास दंड आकारण्यात येणार आहे. वाहनतळांवरील जागेचे आरक्षण आणि शुल्क भरण्यासाठी स्वतंत्र मोबाइल ॲपही विकसित करण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा