लहान मुलांनाही भीती, असुरक्षितता आणि मानसिक ताण जाणवतो, असे डॉक्टर प्राजक्ता पाटील सांगतात. मात्र आपल्या मनातील अस्वस्थता नेमक्या शब्दांत व्यक्त करणे त्यांना अनेकदा जमत नाही. त्यामुळे ही चिंता पोटदुखी, डोकेदुखी, चिडचिड, हट्टीपणा किंवा झोपेच्या तक्रारींमधून व्यक्त होऊ शकते. मुलांच्या वागणुकीतील बदलांकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे, कारण वेळीच ओळखलेली चिंता मुलांना योग्य आधार देण्यास मदत करते.
चिंता कशी व्यक्त होते
मानसिक ताण जाणवल्यावर मेंदूतील भीतीशी संबंधित यंत्रणा सक्रिय होते. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढणे, पोटात गोळा येणे, घाम फुटणे किंवा झोप न लागणे अशा शारीरिक प्रतिक्रिया निर्माण होऊ शकतात. मेंदू आणि पचनसंस्था यांच्यातील परस्परसंबंधामुळे चिंतेचा परिणाम पोटाच्या कार्यावरही होतो. म्हणूनच काही मुले शाळेत जाण्यापूर्वी पोटदुखीची तक्रार करतात.
वर्तनातील बदलही महत्त्वाचे ठरतात. काही मुले सतत पालकांच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतात, तर काहींची चिडचिड वाढते. मुलांच्या नेहमीच्या स्वभावात अचानक बदल झाल्यास त्यामागील कारण समजून घेणे गरजेचे आहे. अभ्यास, स्पर्धा आणि विविध उपक्रमांचा दबावही मुलांवर असतो. शाळा, शिकवण्या आणि इतर उपक्रमांमुळे त्यांना मोकळा वेळ कमी मिळतो. मोबाईलवरील आणि बदलणारे डिजिटल वातावरणही मुलांमध्ये अस्वस्थता वाढवू शकते.
पालकांनी काय करावे
मुलांच्या भावनांकडे दुर्लक्ष न करता त्यांच्याशी शांतपणे संवाद साधावा, असा सल्ला डॉक्टर देतात. ‘तू असा का वागतोस?’ असे विचारण्याऐवजी ‘तुला भीती वाटते आहे का?’ किंवा ‘काही गोष्टींमुळे तू अस्वस्थ आहेस का?’ असे प्रश्न विचारावेत. मुलांना त्यांच्या भावना ओळखण्यासाठी सोपे शब्द द्यावेत. त्यांचे म्हणणे मध्येच न थांबवता ऐकून घ्यावे. मुलाच्या मनात काय चालले आहे हे समजून घेतल्यास त्याची चिंता कमी होण्यास मदत होते. गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणेही योग्य ठरते.
प्रतिक्रिया व्यक्त करा