सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत येत्या काळात सात स्वीकृत सदस्यांची नियुक्ती होणार आहे. ग्रामविकास व पंचायतराज विभागाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील स्वीकृत सदस्यांच्या निवडीबाबत सविस्तर सूचना जारी केल्या आहेत. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, १९६१ मधील सुधारणांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही केली जाणार आहे.
नियमांनुसार जिल्हा परिषदेत निवडून आलेल्या एकूण सदस्यांच्या दहा टक्के, किंवा किमान पाच सदस्य — यापैकी जी संख्या जास्त असेल, तेवढे स्वीकृत सदस्य असतील. पंचायत समितीत हेच प्रमाण वीस टक्के किंवा किमान एक सदस्य असे राहील. सातारा जिल्हा परिषदेच्या बाबतीत हे प्रमाण ६.५० टक्के येते, म्हणजेच सात सदस्य निवडता येतील.
नियुक्तीचे निकष आणि गणनेची पद्धत
स्वीकृत सदस्यांची संख्या ठरवताना अपूर्णांकाबाबतही विभागाने स्पष्टता दिली आहे. अपूर्णांक अर्ध्यापेक्षा कमी असेल, तर तो विचारात घेतला जाणार नाही. अर्धा किंवा त्यापेक्षा अधिक अपूर्णांक असेल, तर त्याची एक म्हणून गणना केली जाईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही ठिकाणी हीच पद्धत वापरली जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पाठवल्या आहेत. ही कार्यवाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या अखत्यारीतील विभागाकडून केली जात आहे.
जागावाटप आणि जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका
स्वीकृत सदस्यांच्या जागांचे वाटप करताना संबंधित राजकीय पक्ष, गट किंवा आघाडी यांच्या निवडून आलेल्या सदस्यांच्या तुलनात्मक संख्याबळाचा विचार केला जाणार आहे. पूर्णांक आणि उरलेला अपूर्णांक विचारात घेण्याची पद्धतही स्पष्ट करण्यात आली आहे. दोन किंवा अधिक पक्षांचे अपूर्णांक समान आले, तर सोडतीद्वारे निर्णय घेतला जाईल.
या प्रक्रियेत जिल्हाधिकाऱ्यांना महत्त्वाची भूमिका देण्यात आली आहे. संबंधित राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून पात्र व्यक्तींच्या नावांची शिफारस करण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीचा विचार करून जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करेल. शिफारस केलेले नाव नाकारायचे झाल्यास त्याची कारणे लेखी स्वरूपात नोंदवणे बंधनकारक राहणार आहे.
वैद्यकीय, शिक्षण, कृषी, जलसंधारण, सहकार, ग्रामीण विकास, महिला व बालविकास, कला, साहित्य, समाजकार्य, अभियांत्रिकी आणि विधी अशा विविध क्षेत्रांतील पात्र व अनुभवी व्यक्तींना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा