अमेरिकेतील प्रत्येक मुलाला स्पेसएक्स कंपनीचे दोन शेअर्स मिळणार आहेत. कंपनीचे प्रमुख इलॉन मस्क यांनी गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही घोषणा केली. यातील एक शेअर कंपनीकडून दिला जाणार आहे, तर दुसरा शेअर मस्क स्वतःच्या पैशातून देणार आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेतील लाखो मुलांना स्पेसएक्समध्ये भागीदारी मिळणार असून, भविष्यात या शेअर्सच्या माध्यमातून त्यांना आर्थिक लाभही होऊ शकेल.
ट्रम्प अकाउंटमध्ये शेअर्स जमा होणार
अमेरिकेतील मुलांच्या भविष्यासाठी ट्रम्प अकाउंट नावाची विशेष गुंतवणूक खाती तयार करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये पैसे किंवा गुंतवणूक जमा करून मुलांसाठी दीर्घकालीन बचत करता येते. या खात्यांना करसवलतही मिळते. याआधी स्पेसएक्सने प्रत्येक सक्रिय ट्रम्प अकाउंटमध्ये कंपनीचा एक शेअर जमा करण्याची घोषणा केली होती. आता कंपनी जेवढे शेअर्स देईल, तेवढेच शेअर्स मस्क स्वतःच्या पैशातून देणार आहेत. स्पेसएक्सकडून दिले जाणारे शेअर्स या खात्यांमध्ये जमा केले जाणार आहेत. मात्र, मस्क स्वतः देणार असलेले शेअर्सही याच खात्यांमध्ये जमा होतील का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शेअर्सची विक्री करता येणार का, अद्याप स्पष्ट नाही
हे शेअर्स मिळाल्यानंतर ते लगेच विकता येतील की काही काळ विक्री करता येणार नाही, याबाबतही कंपनीने माहिती दिलेली नाही. स्पेसएक्सने सोशल मीडियावर पोस्ट करून लाखो अमेरिकन मुलांना प्रत्येकी एक शेअर देण्याचे आश्वासन दिले आहे. भविष्यातील विकासात मुलांनाही कंपनीचे भागधारक म्हणून सहभागी करून घेण्याचा या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे कंपनीने म्हटले आहे. स्पेसएक्सचे उद्दिष्ट मानवाला पृथ्वीबाहेरील इतर ग्रहांवरही राहता यावे, असे आहे. भविष्यातील तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रातील प्रगतीमध्ये नव्या पिढीलाही सहभागी करून घेण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. गेल्या महिन्यातही मस्क यांनी अमेरिकेतील प्रत्येक मुलाला स्पेसएक्सचा एक शेअर देण्याची घोषणा केली होती. भविष्यातील अर्थव्यवस्थेत लोकांना थेट भागीदारी मिळायला हवी. त्यासाठी लोकांच्या हातात थेट शेअर्स देणे हा योग्य मार्ग असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, बुधवारी नॅस्डॅक बाजारात स्पेसएक्सचा एक शेअर १२७ डॉलरवर बंद झाला होता. आता मस्क यांच्या घोषणेनंतर अमेरिकेतील मुलांना हे शेअर्स नेमके कधी आणि कोणत्या अटींवर मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा