थंडीच्या दिवसांत हवा कोरडी होत जाते. त्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होतो आणि त्वचा निस्तेज दिसू लागते. अशा वेळी त्वचा दिवसभर मऊ राहावी, यासाठी योग्य बॉडी लोशन निवडणे महत्त्वाचे ठरते. पण बाजारात मिळणारे प्रत्येक लोशन त्वचेसाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे लोशन खरेदी करण्यापूर्वी त्यातील घटक तपासणे गरजेचे आहे.
लोशनमध्ये कोणते घटक असावेत?
हायलुरोनिक अॅसिड किंवा ग्लिसरीन असलेले लोशन हवेतील ओलावा शोषून घेऊन तो त्वचेत टिकवून ठेवते. त्यामुळे त्वचा बराच वेळ मऊ राहते. शिया बटर, कोको बटर, व्हिटॅमिन ई किंवा बदामाचे आणि नारळाचे तेल असे घटक कोरड्या आणि फाटलेल्या त्वचेला पोषण देऊन मऊ करतात. त्यामुळे लोशन निवडताना त्यावर छापलेले घटक वाचणे उपयुक्त ठरते.
अति कोरड्या त्वचेसाठी काय निवडावे?
ज्यांची त्वचा खूप कोरडी असते, त्यांनी पातळ लोशनऐवजी थोडे दाट आणि क्रीम-बेस्ड लोशन किंवा बॉडी बटर निवडावे. हिवाळ्यातही सूर्याची अतिनील किरणे त्वचेला नुकसान पोहोचवतात, त्यामुळे दिवसा वापरण्यासाठी किमान एसपीएफ १५ किंवा ३० असलेले लोशन निवडणे फायदेशीर ठरते. लोशनचा सर्वाधिक फायदा मिळवण्यासाठी ते आंघोळीनंतर लगेच, त्वचा थोडी ओलसर असतानाच लावावे.
प्रतिक्रिया व्यक्त करा