भारताशी तणावपूर्ण राजकीय संबंध असूनही बांगलादेशच्या क्रिकेटपटूंनी पुढील महिन्यात होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या लिलावासाठी नावनोंदणी केली आहे. गोव्यात १६ डिसेंबर रोजी होणाऱ्या छोट्या लिलावासाठी १,२२० खेळाडूंची प्रारंभिक यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात बांगलादेशी खेळाडूंचा समावेश आहे. फ्रँचायझींच्या निवडीनंतर ही यादी आणखी कमी केली जाणार आहे.
लिलावातील जागा आणि मुस्तफिजुर प्रकरण
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सांगितले की, लिलावापूर्वी फ्रँचायझींनी १८४ खेळाडूंना कायम ठेवले आहे. त्यामुळे आता २५ परदेशी खेळाडूंसह जास्तीत जास्त ६६ जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या लिलावात कोलकाता नाइट रायडर्सने बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला दहा लाख डॉलरहून अधिक किमतीत विकत घेतले होते. मात्र, मंडळाने त्याला वगळण्याचे आदेश दिल्यानंतर बांगलादेशने भारतात खेळण्याबाबत आक्षेप घेतला होता.
बांगलादेशची माघार आणि आताची भूमिका
बांगलादेशातील राजकीय घडामोडी आणि हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांमुळे भारतात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर बांगलादेशी खेळाडूंवरही आयपीएलमध्ये बंदी घालावी, अशी जोरदार मागणी चाहत्यांकडून होत होती. जनभावनेचा आदर करत मंडळाने मुस्तफिजुर रहमानला संघातून वगळण्याचे निर्देश दिले होते. या घटनेनंतर आक्रमक पवित्रा घेत बांगलादेशने विश्वचषकाचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत खेळवण्याची अट घातली होती; मात्र ती फेटाळली गेल्याने त्यांनी स्पर्धेतूनच माघार घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव भारतात सामने खेळण्यास नकार दिल्यानंतर बांगलादेशला विश्वचषकातून वगळण्यात आले होते. पण आता परिस्थिती बदललेली दिसत असून आगामी आयपीएल लिलावासाठी तब्बल १२ बांगलादेशी खेळाडूंनी आपली नावे नोंदवली आहेत. काही परदेशी खेळाडूंनी स्पर्धेत संपूर्ण कालावधीसाठी उपलब्ध नसल्याचे स्पष्ट केले आहे. न्यूझीलंडचा फलंदाज बेवोन जॉन जेव्सने या स्पर्धेसाठी नाव दिले आहे, परंतु तो फार कमी सामने खेळणार आहे. इंग्लंडचा सॅम बिलिंग्सही ८० टक्के सामन्यांसाठीच उपलब्ध असेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा