उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या निवडणुकीत पक्ष सुमारे ३० जागा लढवण्याची तयारी करत आहे. शिवसेनेचे राष्ट्रीय सचिव अभिजीत अडसूळ यांनी ही माहिती दिली. पक्षाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनीही पक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले.
दुबे यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा भाग म्हणून निवडणूक लढवण्याची आशा व्यक्त केली. प्रत्येक पक्षाला आपला विस्तार व्हावा असे वाटते आणि अधिकाधिक राज्यांमध्ये निवडणूक लढवण्याची सर्वच पक्षांची इच्छा असते, असे ते म्हणाले. राष्ट्रीय पक्ष व्हावे असे कोणत्या पक्षाला वाटणार नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उत्तर प्रदेशातील शिवसेनेचा इतिहास
दुबे यांनी उत्तर प्रदेशातील शिवसेनेच्या अस्तित्वाकडेही लक्ष वेधले. १९९० च्या दशकात उत्तर प्रदेशात शिवसेनेचा उमेदवार निवडून आला होता. पवन पांडे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षाने त्यावेळी उत्तर प्रदेशात आपले अस्तित्व दाखवून दिले होते, असे दुबे म्हणाले. आता नेते तोच वारसा पुढे नेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
१९९१ मध्ये अकबरपूर मतदारसंघातून शिवसेनेचे पवन पांडे विजयी झाले होते. उत्तर प्रदेशातील ते शिवसेनेचे आतापर्यंतचे एकमेव आमदार ठरले आहेत. पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यांच्या विजयामुळे शिवसेनेने उत्तर प्रदेश विधानसभेत खाते उघडले होते, पण त्यानंतर शिवसेनेच्या उमेदवाराला एकदाही विजय मिळवता आला नाही.
उद्धव ठाकरेंच्या काळात पाटी कोरी
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्याकडे आली. या काळात भाजपसोबत युती असतानाही शिवसेनेने अनेकदा उत्तर प्रदेशात स्वबळ आजमावले. मात्र शिवसेनेची पाटी कोरीच राहिली. शिवसेनेचा मतांचा टक्का ०.१० पर्यंतच राहिला आणि उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होत गेली.
त्यामुळे उद्धव ठाकरे यांना एकदाही न जमलेली किमया एकनाथ शिंदे यांना जमणार का आणि उत्तर प्रदेशात शिवसेना खाते उघडणार का, याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. उत्तर प्रदेशात किती आणि कोणत्या जागा लढवायच्या, याचा निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, असे दुबे यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा