पनवेलमध्ये भाजपच्या ठाणे-कोकण विभागाची कार्यशाळा पार पडली. पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण या कार्यशाळेला उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. १ ते २५ डिसेंबरदरम्यान राबवण्यात येणाऱ्या सेवा दूत अभियानाची तयारी आणि त्याची रणनीती यावर या कार्यशाळेत चर्चा झाली.
सेवा दूत अभियान म्हणजे काय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सार्वजनिक जीवनात २५ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने हे अभियान राबवले जाणार आहे. या २५ दिवसांत पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून सरकारी योजनांचा आढावा घेतील. त्याचबरोबर पक्षाची संघटना मजबूत करण्याचे कामही कार्यकर्ते करणार आहेत. या अभियानाच्या काळात भाजपचे वरिष्ठ नेते देशभरातील विविध विधानसभा मतदारसंघांत जाऊन मुक्काम करणार आहेत.
कार्यशाळेत काय ठरलं
कार्यशाळेत अभियानाची कार्यपद्धती, सूक्ष्म नियोजन आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थितांना मार्गदर्शन करताना चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घ्याव्यात, त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावी. हाच या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा