काही गाणी अशी असतात की ती कितीही वर्षे जुनी झाली तरी लोकांच्या मनात ताजी राहतात. १९८७ मध्ये आलेल्या ‘गंमत जंमत’ चित्रपटातील ‘अश्विनी ये ना’ हे असंच एक गाणं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांनी या गाण्याला आपला आवाज दिला होता. त्यांच्या वेगळ्या शैलीमुळे हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.
या गाण्यात अनुराधा पौडवाल यांचाही आवाज आहे. अरुण पौडवाल यांनी याला संगीत दिलं असून शांताराम नांदगावकर यांनी त्याचे शब्द लिहिले आहेत. हे गाणं अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांच्यावर चित्रित झालं आहे.
उच्चारांची अडचण आणि गीतकाराची युक्ती
‘गंमत जंमत’साठी किशोर कुमार यांच्याकडून गाणं गाऊन घ्यायचं, असा दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांचा आग्रह होता. मात्र मराठी भाषेतील ‘च’ आणि ‘ळ’ या अक्षरांचे उच्चार किशोर कुमार यांना व्यवस्थित जमत नव्हते. त्यामुळे मराठी गाणं गाण्यास ते सुरुवातीला तयार नव्हते. ही गोष्ट सचिन पिळगावकर यांनी एका मुलाखतीत सांगितली होती.
अखेर गीतकार शांताराम नांदगावकर यांनी एक वेगळी युक्ती शोधली. त्यांनी गाण्याचे शब्द लिहिताना ‘च’ आणि ‘ळ’ ही अक्षरं अजिबात वापरली नाहीत. त्यामुळे किशोर कुमार यांना गाणं गाणं सोपं गेलं आणि त्यांनी या गाण्याला आवाज दिला. एका छोट्याशा युक्तीमुळे मराठी संगीताला एक अजरामर गाणं मिळालं.
शूटिंगच्या वेळी घडलेली गंमत
गाण्याच्या चित्रीकरणावेळीही एक रंजक प्रसंग घडला. शूटिंग सुरू असताना नृत्यदिग्दर्शक काही कारणाने सेटवर येऊ शकले नाहीत. त्यामुळे ऐनवेळी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी सचिन पिळगावकर यांनी स्वतः घेतली आणि गाण्यातील नृत्याच्या पायऱ्या त्यांनीच बसवल्या.
किशोर कुमार यांनी अशोक सराफ यांच्यासाठी आणखी एक मराठी गाणं गाण्याचं आश्वासन दिलं होतं. ‘तुझी माझी जोडी जमली’ हे गाणंही त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झालं. मात्र त्यानंतर किशोर कुमार यांचं निधन झालं. ‘अश्विनी ये ना’ हे गाणं आजही प्रत्येकाच्या ओठांवर असतं आणि हीच त्याची खरी ओळख आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा