पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांचा बहुप्रतिक्षित कार्यक्रम शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स येथे दुपारी तीन ते रात्री दहा या वेळेत हा कार्यक्रम होईल. मात्र कार्यक्रमावर हल्ला करण्याच्या धमक्या मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा हाय अलर्ट जारी केला आहे. यापूर्वीही या कार्यक्रमाला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती.
परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त
धमक्यांची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. कार्यक्रमादरम्यान संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात राहणार आहेत. कोणत्याही संशयास्पद हालचालींवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करा
कार्यक्रमामुळे महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली आणि केशवराव खाड्ये मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात अनावश्यक प्रवास टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्ग म्हणून कोस्टल रोडचा वापर करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या प्रेक्षकांनी खासगी वाहनांऐवजी बेस्ट बस, लोकल ट्रेन आणि मेट्रो यांसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असेही पोलिसांनी सांगितले आहे. वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा