आमदार रोहित पवार यांनी नागपूरमधील नियोजित मोर्चाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा मोर्चा पूर्णपणे अराजकीय असावा आणि त्यात पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह असू नये, अशी त्यांची इच्छा आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला मदत कशी करता येईल, यासाठीच हा मोर्चा असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुण्यातील कायदा व सुव्यवस्थेवरूनही रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. त्यांच्या सरकारच्या काळात सर्व निर्णय अजित पवार घेत असत आणि अधिकाऱ्यांवर त्यांचा ताबा होता, असं ते म्हणाले. मात्र आता पुण्याचे पोलीस आयुक्त फक्त भाजप नेत्यांचं, विशेषतः मुख्यमंत्र्यांचं ऐकतात, त्यामुळे सुनेत्रा पवार यांना अडचण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुनेत्रा पवारांबाबत माफी, पण भूमिका ठाम
रोहित पवार म्हणाले की, अजितदादांबाबत बोलताना ते काही प्रमाणात भावुक झाले होते. त्यामुळे आक्रमकपणे बोललो असेल आणि सुनेत्रा वहिनींना वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र आपण चुकीचं काही बोललो नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
सर्व अधिकाऱ्यांना सांगा की सुनेत्रा पवार यांना ताकद द्या, असं आवाहनही त्यांनी केलं. कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलायचं झालं तर फार वाईट अवस्था झाली असून, हे आकड्यांवरून सांगता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. कायदा व सुव्यवस्था राखली जात नसेल तर मुख्यमंत्र्यांनी हे पद सक्षम नेत्याला द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली.
मोर्चा अराजकीयच राहणार
मोर्चाच्या बैठकीत दुष्काळाबाबत चर्चा झाली असून, दुष्काळाने होरपळणाऱ्या जनतेला कशी मदत करता येईल यावर विचारमंथन झालं. या बैठकीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. हे आंदोलन पूर्णपणे अराजकीय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मोर्चात पवार साहेबांचा फोटो फक्त यासाठी आहे की साहेबांनी महिला आणि शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय घेतले आहेत, असं रोहित पवार म्हणाले. हे कुठेही राजकीय आंदोलन वाटू नये आणि याला कोणत्याही प्रकारचं राजकीय वळण येऊ नये म्हणून पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह नको, अशी भूमिका त्यांनी मांडली. सत्तेतील भाजप पक्ष हे राजकीय आंदोलन असल्याचं म्हणेल, म्हणून सर्वांचीच हा अराजकीय मोर्चा व्हावा अशी इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.
सामान्य व्यक्तीला अडचण आली की आम्ही आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही, असंही रोहित पवार म्हणाले. आम्ही विरोधात आहोत, भूमिका घेत राहणार आणि लढत राहणार, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
प्रतिक्रिया व्यक्त करा