बिहारच्या मोकामा येथील आमदार अनंत सिंह यांच्या कन्या शिवांगी हिचा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. रात्रभर चाललेल्या या सोहळ्यानंतर सकाळी पाहुणे आपापल्या घरी जायला निघाले होते. लग्नाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात दुपारी घोडेस्वारीची स्पर्धाही ठेवण्यात आली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने लोक आले होते. या गर्दीतच एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ते गर्दीत बेशुद्धावस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे भव्य सोहळ्यात अचानक खळबळ उडाली.
संध्याकाळी सहा वाजता बेशुद्धावस्थेत आढळले
संध्याकाळी सहा वाजता हा वृद्ध व्यक्ती गर्दीत बेशुद्ध पडल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना मोटरसायकलवरून अनुमंडळ रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात या वृद्ध व्यक्तीला व्हिलचेअरवर ठेवून त्यांची तपासणी केली जात असल्याचे दिसत आहे. त्यांच्या बाजूला काही पोलीसही उभे असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.
गर्दीमुळे स्पर्धा रद्द, ओळख पटवण्याचे काम सुरू
शिवांगीचे लग्न २५ नोव्हेंबर रोजी पार पडले. लदमा गावात आयोजित या घोडेस्वारी स्पर्धेत देशभरातून घोडेस्वार सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. अनंत सिंह स्वतःही ही स्पर्धा पाहण्यासाठी पोहोचले होते. मात्र गर्दी प्रचंड वाढल्याने घोडेस्वारीची स्पर्धा रद्द करण्यात आली. आज या स्पर्धेचा अंतिम फेरा होणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी आलेले लोक मोबाईल टॉवरवर आणि झाडांवर चढून उभे होते. जीवाची पर्वा न करता लोक वर चढल्याने अनंत सिंह यांनी माईकवरून त्यांना खाली उतरण्याचे आवाहन केले, पण त्यांचे कोणीही ऐकले नाही. त्याचवेळी गर्दीत एक व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळल्याने सर्वजण चकित झाले. काही माध्यमांच्या माहितीनुसार, या वृद्ध व्यक्तीच्या खिशात २,१२० रुपये सापडले आहेत. त्यांच्याकडे इतर कोणतेही कागदपत्र किंवा मोबाईल फोन आढळला नाही. हा व्यक्ती कोण, कुठून आला आणि त्याच्यासोबत कोणी होते का, याचा शोध घेत त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा