अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह एकूण 14 देशांवर पुन्हा एकदा टॅरिफ लावण्याची तयारी सुरू केली आहे. त्याबाबतचा प्रस्तावही समोर आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली तर त्याचा सर्वाधिक फटका चीनला बसणार आहे. भारताचेही भविष्यात नुकसान होऊ शकते.
दरम्यान, आता अमेरिकेच्या या धोरणाविरोधात चीनने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. अमेरिकेने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अन्यथा आवश्यक ते पाऊल उचलण्याचा अधिकार आम्ही सुरक्षित ठेवला असून योग्य तो निर्णय घेऊ, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.
चीनची भूमिका काय?
अमेरिकेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी चीनने केली आहे. चीनच्या वाणिज्य मंत्रालयाचे प्रवक्ते हे यादोंग यांनी या भूमिकेविषयी सविस्तर माहिती दिली. टॅरिफचा निर्णय घेण्यासाठी अमेरिकेने जी चौकशी केली आहे, ती एकतर्फी आहे, असे त्यांनी म्हटले.
चीन या निर्णयाचा कठोर विरोध करत आहे. अमेरिकेने या चुकीच्या प्रथांमध्ये सुधारणा करायला हवी. चर्चा आणि संवादाच्या मदतीने आपापसातील मतभेद मिटवले जाऊ शकतात, असे मत यादोंग यांनी व्यक्त केले.
व्यापार तणाव वाढण्याची शक्यता
अमेरिकेने चीन, युरोपीय संघ, जपान तसेच अन्य काही देशांवर 20 टक्के टॅरिफ लादण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या निर्णयाला चीनचा कठोर विरोध आहे. त्यामुळे अमेरिका आणि चीन यांच्यात पुन्हा व्यापारविषयक तणाव वाढू शकतो.
सध्याच्या धोरणामुळे अमेरिकेतील स्थानिक उद्योगांना फटका बसत आहे, असा दावा अमेरिकेकडून केला जात आहे. अमेरिकेने टॅरिफ लादल्यास चीन नेमका काय निर्णय घेणार आणि हा टॅरिफ वाद चिघळत जाणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा