२६ नोव्हेंबर २००८ हा दिवस मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतिहासातील काळरात्र म्हणून ओळखला जातो. त्या दिवशी पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नरिमन हाऊस यांसह शहरातील अनेक गर्दीच्या ठिकाणी हल्ले केले होते. या हल्ल्यात शेकडो निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आता अठरा वर्षे पूर्ण होत आहेत, मात्र त्या रात्रीचे भय आजही अनेकांच्या मनात ताजे आहे.
करमाळा येथील माजी नगरसेवक फारुक जमादार हे त्या हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी आहेत. मंत्रालयातील कामासाठी ते आपले मित्र, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ आणि साबीर तांबोळी यांच्यासह मुंबईला गेले होते. कामे आटोपल्यानंतर संध्याकाळी सातच्या सुमारास ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पोहोचले. दीपक ओहोळ खासगी वाहनाने करमाळ्याला निघून गेले, तर जमादार आणि तांबोळी सिद्धेश्वर एक्स्प्रेसच्या प्रतीक्षेत स्थानकावर थांबले.
गोळीबार सुरू झाला तेव्हा
गाडीला वेळ असल्याने त्यांना स्थानकावर जवळपास तीन तास थांबावे लागले. त्या वेळी स्थानकावर प्रचंड गर्दी होती. सौदी अरेबियाला हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंना निरोप देण्यासाठी आलेले लोकही मोठ्या संख्येने तिथे होते. रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सिद्धेश्वर एक्स्प्रेस फलाट क्रमांक १४ वर येत असल्याची घोषणा झाली. त्यानंतर ते फलाटाच्या दिशेने निघाले असतानाच, रात्री नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अचानक गोळीबार सुरू झाला. फटाक्यांच्या माळीसारखा सतत आवाज येत होता, अशी आठवण जमादार यांनी सांगितली.
गोळीबार सुरू होण्यापूर्वी काही क्षण आधीच जमादार यांनी आपली जागा सोडली होती. मात्र त्यांच्या शेजारी बसलेले सोलापूरचे प्रवासी आणि हजला जाणारे यात्रेकरू व त्यांचे नातेवाईक या गोळीबारात सापडले. दुर्दैवाने त्यातील काहींचा मृत्यू झाल्याचे नंतर कळले. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर शहारे येतात, असे ते म्हणाले.
डब्यातील अठरा प्रवाशांची धावपळ
गोळीबार सुरू होताच सर्वत्र गोंधळ उडाला. लोक सैरावैरा पळू लागले आणि प्रत्येकजण सुरक्षित जागा शोधू लागला. भीतीचे वातावरण पसरले होते आणि प्रत्येक अनोळखी व्यक्ती संशयास्पद वाटत होती. जमादार धावत जाऊन रेल्वेच्या एका डब्यात बसले. त्या डब्यात त्यांच्यासह अठरा प्रवासी होते. त्यात सोलापूरच्या काही महिलाही होत्या. त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केल्याचे जमादार यांनी सांगितले.
अठरा वर्षांनंतरही २६/११ च्या त्या रात्रीच्या आठवणी प्रत्यक्षदर्शींच्या मनातून पुसल्या गेलेल्या नाहीत. त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या स्मृतींना आजही संपूर्ण देश आदरांजली वाहतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा