पश्चिम रेल्वेच्या लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सुविधा लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. सध्या अंधेरीपर्यंत धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकलचा विस्तार आता वांद्रे स्थानकापर्यंत करण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या फलाटांच्या विस्ताराचं काम वेगाने सुरू असून, बहुतांश कामं प्रगतिपथावर आहेत. या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी कमी करण्यास मदत होणार आहे.
चार स्थानकांवर फलाटांचं विस्ताराचं काम
वांद्र्यापर्यंत 15 डब्यांची लोकल चालवण्यासाठी वांद्रे, खार रोड, सांताक्रूझ आणि विलेपार्ले या चार स्थानकांवरील फलाटांची लांबी वाढवली जात आहे. 15 डब्यांची लोकल उभी राहण्यासाठी किमान 330 मीटर लांबीचा फलाट आवश्यक आहे. त्यामुळे या स्थानकांवर पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यात येत आहेत. कामाच्या सद्यस्थितीनुसार खार रोड स्थानकातील फलाट विस्ताराचं काम पूर्ण झालं आहे. वांद्रे स्थानकातील काम सुमारे 75 टक्के पूर्ण झालं असून, सांताक्रूझ आणि विलेपार्ले येथील कामं प्रत्येकी 40 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. फलाटांची लांबी वाढवण्याबरोबरच संबंधित ठिकाणी छत उभारण्याचं कामही सुरू आहे.
प्रत्येक फेरीत 600 अतिरिक्त प्रवासी
या विस्ताराचा सर्वाधिक फायदा गर्दीच्या वेळेत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होण्याची अपेक्षा आहे. 12 डब्यांच्या लोकलच्या तुलनेत 15 डब्यांच्या लोकलमधून प्रत्येक फेरीत सुमारे 600 अतिरिक्त प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून, गर्दीच्या समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येईल.
रेल्वे प्रशासनाने या प्रकल्पासाठी मार्च 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. वांद्र्यापर्यंत विस्तार झाल्यानंतर पुढील टप्प्यात दादर आणि त्यानंतर मुंबई सेंट्रलपर्यंत 15 डब्यांच्या लोकल सेवा नेण्याचं नियोजन आहे. मात्र, हा विस्तार उपलब्ध पायाभूत सुविधांनुसार टप्प्याटप्प्याने केला जाणार आहे.
पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकलची सुरुवात 2009 मध्ये दादर-विरार मार्गावर झाली होती. त्यानंतर 2011 मध्ये चर्चगेटहूनही 15 डब्यांची लोकल सुरू झाली. वाढत्या गर्दीचा विचार करून 28 जून 2021 पासून धीम्या मार्गावरही या लोकल सुरू करण्यात आल्या. मात्र, त्यांचा विस्तार अंधेरीपर्यंतच मर्यादित राहिला होता. आता वांद्रे, दादर आणि मुंबई सेंट्रलपर्यंतचा विस्तार टप्प्याटप्प्याने होणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा