परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. काही देशांनी परदेशी नागरिकांसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत. सोपी व्हिसा प्रक्रिया, आर्थिक मदत, स्वस्त किंवा मोफत घर, करसवलत आणि रोजगाराच्या संधी अशा सुविधा या योजनांमध्ये दिल्या जात आहेत. स्थानिक गरजा पूर्ण करणे आणि लोकसंख्येचा समतोल राखणे, हा या योजनांमागचा उद्देश आहे.
कॅनडा, इटली आणि जपानमध्ये काय सुविधा?
कॅनडातील लहान शहरांमध्ये लोकसंख्या वाढवण्यासाठी ग्रामीण आणि उत्तरेकडील भागात विशेष कार्यक्रम राबवला जात आहे. तिथे परदेशी नागरिकांना कायमस्वरूपी वास्तव्याची संधी दिली जाते आणि योग्य ठिकाणी नोकरीही उपलब्ध करून दिली जाते. इटलीतील प्रेसिचे किंवा सम्बुका यांसारख्या छोट्या गावांमध्ये स्थायिक होण्यासाठी २५ हजार युरोंपर्यंत आर्थिक मदत दिली जाते. मात्र तिथे घर खरेदी करून त्याचे नूतनीकरण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची असते.
जपानमध्ये घटती लोकसंख्या ही चिंतेची बाब बनली आहे. तिथे रिकामी घरे भरण्यासाठी अकिया हा उपक्रम सुरू आहे. परदेशी नागरिकांना मोफत किंवा अत्यंत कमी दरात घरे दिली जातात आणि आर्थिक मदतही मिळते. मात्र ग्रामीण भागात राहून तिथली जीवनशैली स्वीकारावी लागते.
जर्मनी आणि स्पेनमधील संधी
जर्मनीत कुशल कामगारांची मोठी गरज आहे. तिथे ईयू ब्लू कार्डसारख्या योजना सुरू आहेत. कुशल कामगारांना चांगले वेतन, मोफत शिक्षण आणि आरोग्य विमा यांसारख्या सुविधा मिळतात. मात्र त्यासाठी उच्च पात्रता असणे आणि आधी नोकरी शोधणे आवश्यक आहे. स्पेनमधील पोंगा यांसारख्या काही गावांमध्ये नवीन कुटुंबांना तीन हजार युरोंपर्यंत मदत आणि मुलांसाठी अतिरिक्त बोनस देण्याची योजना आहे. मात्र ही बोनस योजना सर्वांना लागू होत नाही.
अर्ज करण्यापूर्वी संबंधित देशाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन माहितीची खातरजमा करावी. त्या देशाची भाषा, पात्रतेच्या अटी आणि रोजगाराच्या शर्ती समजून घ्याव्यात. संबंधित देशाच्या दूतावासाशी संपर्क साधावा आणि कोणत्याही दलालावर विश्वास ठेवू नये. योग्य सल्लागाराची मदत घेणे हिताचे ठरेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा