पुणे जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आला आहे. कोर्टाबाहेर काल एक धक्कादायक घटना घडली होती आणि त्याला २४ तास उलटण्याच्या आतच हा धमकीचा मेल आल्याने न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हा सलग तिसरा धमकीचा मेल असल्याची माहिती समोर आली आहे.
बॉम्ब शोधक पथक दाखल; परिसर रिकामा केला
धमकीचा मेल मिळताच बॉम्ब शोधक पथक न्यायालयात दाखल झाले. न्यायालयात उपस्थित असलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. न्यायालयाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईनंतर आता पुणे न्यायालयालाही अशा स्वरूपाचा धमकीचा मेल आल्याचे समोर आले आहे.
७० टक्के सीसीटीव्ही बंद; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
धमकीचा मेल येण्यापूर्वीच जिल्हा न्यायालयाच्या मुख्य सत्र न्यायाधीश अंजू शेटे आणि शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यात न्यायालयातील सुरक्षा उपाययोजनांवर बैठक झाली होती. या बैठकीनंतर लगेचच धमकीचा मेल आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. न्यायालयातील एकूण सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी तब्बल ७० टक्के कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळाली आहे. प्रवेशद्वारावर बसवलेले मेटल डिटेक्टरही बंद अवस्थेत आहेत. मेट्रोच्या कामासाठी रेल्वे रुळालगतची सीमाभिंत पाडण्यात आली असून ती अद्याप बांधण्यात आलेली नाही, त्यामुळे अनधिकृत प्रवेशाचा धोका वाढला आहे. न्यायालय परिसरात अतिक्रमणे, बेशिस्त पार्किंग आणि अपुरा पोलीस बंदोबस्त असल्याचीही तक्रार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आरोपींच्या नातेवाईकांची आणि मित्रमंडळींची मोठी गर्दी न्यायालयात होत असते. सुरक्षा ऑडिटमधील उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सुरक्षा व्यवस्था सक्षम करण्याची मागणी वकील वर्गातून होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा