राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, शिक्षक, कामगार आणि विविध क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना दिलासा देणारे 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमुळे शेती, शिक्षण, आरोग्य, कामगार आणि प्रशासकीय क्षेत्रांत विविध सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
42 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना तीन महिने मोफत धान्य
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दारिद्र्यरेषेखालील आणि थेट लाभ हस्तांतरण योजनेत समाविष्ट नसलेल्या राज्यातील 33 जिल्ह्यांमधील 42 लाख 30 हजार 783 शेतकऱ्यांना पुढील तीन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती दरमहा पाच किलो धान्य मिळणार आहे. यात तीन किलो तांदूळ आणि दोन किलो गव्हाचा समावेश असेल. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.
सिंचन, फसवणूकविरोधी कारवाई आणि शिक्षणात सुधारणा
नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा-तापी वळण योजनेसाठी 5 हजार 548 कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत सहा वळण बंधाऱ्यांची उभारणी करण्यात येणार असून, त्यातून सुमारे 26 हजार 526 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. या प्रकल्पातून 11.50 मेगावॉट वीजनिर्मितीही होणार आहे. ठेवीदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संस्थांविरोधातील कारवाई अधिक वेगवान करण्यासाठी स्वतंत्र एमपीआयडी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित संस्थांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रिया जलद करण्यासाठी अधिनियमात सुधारणा केली जाणार असून, अशा प्रकरणांचा निपटारा 90 दिवसांच्या कालमर्यादेत करण्याचे प्रस्तावित आहे. आरोग्य विज्ञानातील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी ईबीसी, एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत भोजन, निवास आणि निर्वाह भत्त्यात भरीव वाढ करण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा