रक्ताच्या नात्यातील विवाहांमुळे जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य आनुवंशिक परिणामांचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसेच रक्ताच्या नात्यात विवाह केल्यामुळे मुलांना उद्भवू शकणाऱ्या आनुवंशिक आजारांबाबत समाजात जनजागृती करण्याची गरज असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.
हे प्रकरण बंगळुरू येथे राहणाऱ्या चार्वी एस. या विद्यार्थिनीने दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित आहे. चार्वी ही बंगळुरूतील एका विद्यापीठाची विद्यार्थिनी असून, तिची दृष्टी 40 टक्क्यांनी प्रभावित झाली आहे. तिचे आई-वडील हे एकमेकांचे रक्ताचे नातेवाईक असल्याचे तिने याचिकेत नमूद केले आहे. जन्मापासूनच तिला डोळ्यांशी संबंधित आनुवंशिक आजाराचा सामना करावा लागत असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.
वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा
रक्ताच्या नात्यातील विवाहांबाबत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दाही अधोरेखित केला. कोणाशी विवाह करायचा, हा प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा आणि निवडीचा विषय आहे. त्यामुळे अशा विवाहांवर थेट बंदी घालण्याचा अधिकार न्यायालयाला नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने विचार
मात्र, रक्ताच्या नात्यात विवाह झाल्यास पुढील पिढीच्या आरोग्यावर होणाऱ्या संभाव्य परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अशा विवाहांमुळे काही आनुवंशिक आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये या विषयाबाबत योग्य माहिती आणि जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने सूचित केले.
रक्ताच्या नात्यातील विवाहांबाबत केंद्र सरकारने कायदेशीर तरतुदी करण्याची किंवा व्यापक जनजागृती अभियान राबवण्याची शक्यता तपासावी, असा मुद्दा न्यायालयाने उपस्थित केला आहे. या विषयाकडे केवळ सामाजिक किंवा वैयक्तिक निवडीच्या दृष्टिकोनातून न पाहता सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही विचार करण्याची आवश्यकता असल्याचे या निरीक्षणातून स्पष्ट होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा