रक्ताच्या नात्यातील लग्न आणि त्यातून होणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर होणारे संभाव्य परिणाम यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटिस बजावली आहे. अशा लग्नांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांचा उल्लेख न्यायालयाने सुनावणीत केला. त्याचबरोबर याबाबत जनजागृती वाढण्याची गरजही न्यायालयाने बोलून दाखवली. मात्र कोणी कोणासोबत लग्न करावे, हा प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.
हे प्रकरण बंगळुरूत राहणाऱ्या चार्वी एस यांच्या याचिकेशी संबंधित आहे. चार्वी या नॅशनल स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांची ४० टक्के दृष्टी प्रभावित झाली आहे. आपले आई-वडील हे रक्ताचे नातेवाईक असल्याचे चार्वी यांनी याचिकेत नमूद केले आहे. जन्मापासून डोळ्यांशी संबंधित आनुवंशिक आजाराचा सामना करावा लागत असल्याचेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.
तीन सदस्यीय घटनापीठाकडून सुनावणी
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय घटनापीठाने या प्रकरणावर सुनावणी घेतली. या घटनापीठात न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचा समावेश होता. रक्ताच्या नात्यातील विवाह रोखण्याचे आदेश देणे न्यायालयाच्या अखत्यारीत येत नसल्याचे सुनावणी दरम्यान म्हटले गेले. त्यामुळे थेट बंदी घालण्याचा अधिकार न्यायालयाकडे नाही, हे स्पष्ट झाले.
कायदा आणि जनजागृतीचा विचार करण्याचा सल्ला
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटिस जारी केली आहे. जवळच्या रक्ताच्या नात्यातील लग्नाचे संभाव्य नकारात्मक परिणाम लक्षात घेऊन त्यासंदर्भात कायदा करण्याचा आणि शाळा-महाविद्यालयातील पाठ्यपुस्तकांसह अन्य माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचा विचार करावा, असा सल्ला न्यायालयाने दिला. लग्न हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे, त्यामुळे लोकांना निवडीचे स्वातंत्र्य असायला हवे. पण त्यासोबतच आरोग्याशी संबंधित संभाव्य धोके लक्षात घेऊन निर्णय घ्यायला हवेत, असे आवाहनही न्यायालयाने केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा